महिला होमगार्डला मारहाण
By admin | Published: March 20, 2017 03:47 AM2017-03-20T03:47:59+5:302017-03-20T03:48:15+5:30
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मुजोरी सुरूच असून त्याचा प्रत्यय आज महिला होमगार्डला आला.
डोंबिवली : डोंबिवलीत रिक्षाचालकांची मुजोरी सुरूच असून त्याचा प्रत्यय आज महिला होमगार्डला आला. मुजोर रिक्षाचालकाने रिक्षात बसलेल्या या होमगार्डला ठाकुर्लीच्या दिशेने नेले आणि मारहाण करून नाल्यात ढकलून दिले. हा प्रकार रविवारी दुपारी बाराच्या दरम्यान घडला. मारहाण झालेल्या होमगार्डचे नाव सुनीता नंद मेहर (३०) आहे. मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली असून रवी गुप्ता (२७) असे त्याचे नाव आहे.
वाहतूक पोलीस व शहर पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने राज्य सरकारकडून त्यांना होमगार्ड पुरविले जातात. त्यांना भत्ता दिला जातो. डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यासमोर रिक्षाचालक रवी गुप्ता याने रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभी केली होती. ती तेथेच आडवी करून तो एकाशी गप्पा मारत होता. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तेथे ड्युटीवर असलेल्या होमगार्ड मेहर यांनी त्याला मज्जाव करीत ‘रिक्षा रस्त्याच्या बाजूला घे’ असे सांगितले. त्यावर रिक्षाचालक संतापला. त्याने होमगार्डच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून अरेरावीची भाषा सुरू केली. त्यामुळे मेहर त्याच्या रिक्षात बसल्या आणि कारवाईसाठी ‘रिक्षा पोलीस ठाण्याला घे’ असे त्यांनी सांगितले. पण गुप्ता याने रिक्षा पोलीस ठाण्याकडे न घेता थेट ठाकुर्लीच्या दिशेने पळविण्यास सुरुवात केली. मेहर यांना उतरण्याची संधी न देता त्याने रिक्षा पळवली. त्याचा कावा लक्षात आल्याने त्यांनी त्याला रिक्षा थांबविण्यास सांगितले, पण त्याने ठाकुर्लीनजीक रिक्षा नेली आणि तेथे तो रिक्षातून खाली उतरला. त्याने होमगार्ड मेहर यांना जबर मारहाण केली. त्यावर न थांबता त्याने त्यांना नाल्यात ढकलून दिले. या मारहाणीत मेहर यांच्या हाताला आणि पायाला जबर दुखापत झाली. हा प्रकार पाहून नागरिक तेथे धावताच गुप्ता तेथून पळाला. मेहर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी रिक्षाचालक गुप्ता याला अटक केली.(प्रतिनिधी)