लालबागच्या राजाच्या दरबारात फसवाफसवी; भक्तांनी अर्पण केल्या जुन्या नोटा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 03:58 PM2017-09-09T15:58:00+5:302017-09-09T15:58:00+5:30
यंदा लालबागच्या राजाच्या दरबारात फसवाफसवीचा कारभार पाहायला मिळाला.
मुंबई, दि. 9- नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. तसंच दर्शनाला येणारे भाविक रिकाम्या हाताने न येता राजासाठी सोन्या-चांदीच्या वस्तूही घेऊन येतात. तर काही जण पैशाचं दान लालबागच्या राजाच्या दानपेटीत टाकतात. दरवर्षी करोडे रूपये राजाच्या दानपेटीत जमा होतात. यंदा मात्र लालबागच्या राजाच्या दरबारात फसवाफसवीचा कारभार पाहायला मिळाला. जुन्या पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्यानंतर अनेकांकडे या नोटा तशाच राहिल्या. चलनातून रद्द झालेल्या नोटा दिलेल्या मुदतीत व्यवहारात आणण्यासाठी लोकांनी वेगवेगळी शक्कल लढवली. चलनातून बाद झालेल्या नोटा लोकांनी थेट लालबागचा राजाच्या चरणी अर्पण केल्याचं उघड झालं आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीला येत्या नोव्हेंबर महिन्याच एक वर्ष पूर्ण होणार आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारने दिलेल्या मुदतीत अनेकांना नोटा बदलून घेता आल्या नाहीत. त्यामुळे स्वत:कडे राहिलेल्या नोटा गणेशभक्तांनी राजाच्या चरणी अर्पण केल्या आहेत. लालबागच्या राजाचे दर्शन घेत चलनातून बाद झालेल्या एक हजाराच्या नोटांचं दान करत पुण्य कमावण्याचा प्रयत्न काहींनी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. लालबागचा राजा गणपतीच्या दानपेटीत चलनातून बाद करण्यात आलेल्या एक हजाराच्या ११० जुन्या नोटा सापडल्या आहेत. या नोटांचं एकुण मुल्य १ लाख १० हजार इतकं आहे.
यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाच्या दानपेटीत ५ कोटी ८० लाखांचं दान जमा झालं आहे. त्यापैकी १ लाख १० हजार रुपयांच्या चलनातून रद्द झालेल्या नोटा आहेत.
दानपेटीत तब्बल 5 कोटी 80 लाखांची रोकड
25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या काळात, लालबागच्या राजाच्या दानपेटीत तब्बल 5 कोटी 80 लाखांची रोकड जमा झाली आहे. त्यापैकी 1 लाख 10 हजार जुन्या हजारांच्या नोटांच्या स्वरुपात आहेत.
गेल्या वर्षीपेक्षा कमी दान
यंदा लालबागच्या दानपेटीत 5 कोटी 80 लाखांची रोकड जमा झाली असली, तरी ती गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. कारण गेल्यावर्षी ही रक्कम तब्बल 8 कोटी इतकी होती. यावर्षी 29 ऑगस्टला झालेल्या तुफान पावसामुळे भाविकांनी घरी राहणंच पसंत केलं होतं. त्यामुळे यंदा रोख रक्कम कमी जमा झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच नोटाबंदीचाही परिणाम झाल्याचा अंदाज आहे.
5.8 कोटी रुपये, 5.5 किलो सोनं, 70 किलो चांदी
लालबागच्या दरबारात भक्तांनी भरभरुन दान दिलं आहे. यामध्ये रोख रकमेसह तब्बल 5.5 किलो सोनं आणि 70 किलो चांदीचा समावेश आहे.