गिरीश महाजन यांनी मागितली महिलांची माफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 06:18 AM2017-11-07T06:18:21+5:302017-11-07T06:18:31+5:30
दारूला महिलांचे नाव देण्याचे वक्तव्य विनोदाचा भाग म्हणून बोललो. त्यात महिलांचा अपमान करण्याचा माझा उद्देश नव्हता. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरीच नव्हे तर माफी मागतो
मुंबई : दारूला महिलांचे नाव देण्याचे वक्तव्य विनोदाचा भाग म्हणून बोललो. त्यात महिलांचा अपमान करण्याचा माझा उद्देश नव्हता. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरीच नव्हे तर माफी मागतो, असे स्पष्टीकरण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
शहादा येथे सातपुडा सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगामाच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री महाजन यांनी मद्याची नावे स्त्रीवाचक असल्यामुळे त्यांचा खप जास्त आहे़ सातपुडा साखर कारखान्यानेही त्यांच्या ब्रँडला महिलेचे नाव द्यावे, असा सल्ला दिला. त्यावरून वाद झाला. मी विनोदाचा भाग म्हणून बोललो, असे ते म्हणाले. दिलगिरी हा गुळगुळीत राजकीय शब्द वाटेल म्हणून मी माफी मागतो, असे ते म्हणाले. मी व्यसन करत नाही. नेहमीच दारूमुक्ती, नशामुक्ती मोहिमेला पाठिंबा दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.