अनुसूचित जाती जमातींना क्रिकेटमध्ये 25 टक्के आरक्षण द्या - रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2017 12:52 PM2017-07-01T12:52:48+5:302017-07-01T13:02:08+5:30
नेहमीच उलट-सुलट विधाने करुन चर्चेत राहणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे विधान केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर दि. 1 - नेहमीच उलट-सुलट विधाने करुन चर्चेत राहणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे विधान केले आहे. क्रिकेटमध्येही अनुसूचित जाती-जमातीला 25 टक्के आरक्षण द्या तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आपण पाकिस्तानकडून कसे हरलो त्याची चौकशी करा अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता. इतका बलवान संघ अंतिम फेरीत 180 धावांनी पराभूत कसा होतो ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. रामदास आठवले मोदी सरकारमध्ये सामाजिक, न्याय खात्याचे राज्यमंत्री आहेत. पाकिस्तानच्या 339 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव 158 धावात आटोपला. हार्दिक पांडया वगळता (76) सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले.
राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार आहे, आता या सरकारने स्वतंत्र विदर्भाचा निर्णय घ्यावा असे रामदास आठवले यांनी सांगितले. पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्याशी यासंदर्भात मी बोलणार, शेतकरी कर्जमाफीच्या धर्तीवर मागासवर्गीय महामंडळातील कर्ज माफ करावे, गोवंश हत्यातून वंश शब्द काढावा असे त्यांनी म्हटले.
तीन-चार दिवसांपूर्वी रामदास आठवले यांच्या ताफ्याला पुणे येथे हायवेवर अपघात झाला. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. पुण्यात किवळेफाटा हायवे येथे रस्त्याच्या मधोमध एक तवेरा गाडी उभी होती. सुरुवातीला रस्त्यात गाडी उभे असल्याचे आठवले यांच्या गाडीच्या चालकाला दिसले नाही. मात्र ही बाब लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीनं स्वतःची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, यावेळी आठवले यांच्या वाहनामागे असलेल्या पोलीस वाहनाची त्यांच्या गाडीला जोरदार धडक बसली. यात रामदास आठवले यांच्या वाहनाचे नुकसान झाले मात्र सुदैवानं कुणीही जखमी झालेले नाही. रामदास आठवलेदेखील सुखरूप आहेत.
ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा आठवले यांच्यासोबत रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खांबाळकर, महाराष्ट्र सचिव श्रीकांत भालेराव, पुणे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे आणि रिपाइंचे प्रसिद्ध प्रमुख हेमंत रणपिसे व सहाय्यक खासगी सचिव प्रवीण मोरे हेदेखील होते. हे सर्वजण सुखरूप आहेत.
पुण्यातली बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी रामदास आठवले तेथे निधाले होते. या अपघातानंतर त्यांनी कार्यक्रमास हजेरीदेखील लावली व त्यानंतर पुढे अहमदनगरकडे रवाना झाले.
आणखी वाचा
दरम्यान, कार्यक्रमात रामदास आठवले यांनी राजकीय टिपण्णी करताच बालगंधर्व रंगमंदिरात एकच हशा पिकला. ‘मी बरेच दिवस शरद पवारांबरोबर राहिलो, त्यांच्याकडून राजकारण शिकलो. सध्या ते आमचे मित्र नाहीत. राजकारणात फार काळ एका व्यक्तीसोबत रहायचे नसते. आता मी पुढील १० वर्षे तरी नरेंद्र मोदींना सोडणार नाही, तेही मला सोडणार नाहीत. त्यानंतर हवा ज्या दिशेला वाहणार, तिकडे आम्ही जाणार! हवेची दिशा जाणून प्रवास केल्यासच राजकारणात टिकाव लागतो’, अशा मिश्किल शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजकीय टिपण्णी करताच बालगंधर्व रंगमंदिरात हास्याचे फवारे उडाले.
बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बालगंधर्व परिवारातर्फे आयोजित हास्य कवी संमेलनाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, हास्यकवी बंडा जोशी, भरत दौंडकर, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, बालगंधर्व परिवाराचे मेघराज राजेभोसले आदी उपस्थित होते.
आपल्या देशात केल्यामुळे नोटबंदी, फारच परेशान दिसताहेत राहूल गांधी, देशात आलीये नरेंद्र मोदींची आंधी, त्यांनी तोडून टाकली काँग्रेसची फांदी’, ‘शिवशक्ती, भीमशक्ती एकत्र आली, काँग्रेसची सत्ता गेली’ अशा कविता सादर करत आठवलेंनी वातावरणात हास्याचे रंग भरले.
आठवले म्हणाले, ‘माझ्या पक्षाची ताकद लहान असली तरी आम्ही २९ राज्यात कार्यरत आहोत. गावागावात माझी कणसासारखी गोड माणसे काम करत आहेत. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचे विचार घेऊन आम्ही पुढे वाटचाल करत आहोत.’