हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला...!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 06:00 AM2018-08-12T06:00:05+5:302018-08-12T06:00:05+5:30
सृजनाला आवाहन करणारा, कवींना भुरळ घालणारा असा हा आनंदधन श्रावण. वातावरणातील प्रसन्नतेने आशादायी बदलांची सकारात्मक चाहूल देणारा श्रावण.
विजय बाविस्कर :
हासरा नाचरा जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला,
तांबुस कोमल पाऊल टाकीत,
भिजल्या मातीत श्रावण आला
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या काव्यपंक्ती आज आवर्जून आठवतायत... ज्येष्ठ-श्रेष्ठ कवींच्या प्रतिभेला बहर आणणारा, तनामनात चैतन्य फुलविणारा, पाचूसारखा हिरवागार श्रावण आजपासून सुरू होत आहे. सण-उत्सवांसह विविध व्रतवैकल्यांची रेलचेल असलेल्या श्रावणाच्या स्वागतासाठी सृष्टी सजली आहे. पावसाची आषाढ-झड थांबली आहे. बालकवींनी म्हटल्याप्रमाणे,
श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनि ऊन पडे
असे रमणीय वातावरण आसमंतात आले आहे. श्रावण हा भारतीय वर्षगणनेतील पाचवा महिना. पौर्णिमेच्या सुमारास श्रवण नक्षत्र असते; म्हणून या महिन्याला श्रावण असे नाव. चातुर्मासातील श्रेष्ठ मास श्रावण म्हणजे सणसमारंभांच्या रूपाचे चैतन्यपर्व. शुद्ध आणि सात्त्विकतेचे आवरण पर्यावरण. घरगुती ते सार्वजनिक सणांचा हा महिना. प्रत्येकाच्या मनात श्रावणाचे रंग वेगळे असतात. महाराष्ट्राचे वाल्मीकी महाकवी ग. दि. माडगूळकरांचे
‘बरसू लागल्या रिमझिम धारा,
वारा फुलवी मोरपिसारा,
हलू लागली झाडे वेली नाच सुरू जाहला’
हे शब्द गुणगुणत महिलांनी मंगळागौरीच्या सणाची तयारी सुरू केली आहे. ‘रांधा- वाढा- उष्टी काढा’पासून नोकरदार महिलांपर्यंत परिवर्तन झाले, तरी श्रावण म्हणजे स्त्रीजीवनातील आध्यात्मिक, सांस्कृतिक विसावा. महिलांच्या कलागुणांना व्यक्त होण्यासाठी व श्रमपरिहारासाठी पूर्वजांनी कल्पकतेने याचा संबंध सण-उत्सवांशी जोडला आहे. रोजच्या कामाच्या धबडग्यात हरवलेल्या महिला मंगळागौरीच्या निमित्ताने धमाल करून कष्ट, श्रम विसरतात आणि अधिक ताज्यातवान्या होतात. शुद्धपंचमीला नागाची पूजा केली जाते. कविवर्य गदिमा आणि भावगीतगायक गजाननराव वाटवे यांनी अजरामर केलेले
‘फांद्यावरी बांधियले गं मुलिंंनी हिंदोले,
पंचमीचा सण आला डोळे माझे ओले’
हे गीत स्त्रीजीवनातील नागपंचमीचे महत्त्व सांगून जाते. निसर्गाशी एकात्मतेची व भूतदयेची शिकवणही हा श्रावण देतो. नारळी पौर्णिमेला कोळी बांधव वरुणदेवतेप्रीत्यर्थ नदी वा समुद्राची पूजा करून त्यांना नारळ अर्पण करतात. याच दिवशी साजºया होणाऱ्या रक्षाबंधनाला बहिणीला आपला भाऊराया भेटतो. बहीण भावाच्या हाताला राखी बांधून हे भावबंध अधिक दृढ करते. श्रावणी अमावास्येला पोळ्याचा सण साजरा करून बळीराजा बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. बैलांना शृंगारून त्यांची मिरवणूक काढून कृषी संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. वद्य अष्टमीला मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्मदिन जन्माष्टमी किंंवा कृष्णाष्टमी म्हणून साजरा केला जातो. नवमीला गोपाळकाल्याच्या दहीहंडी उत्सवात तरुणाई जल्लोषात न्हाऊन निघते.
सृजनाला आवाहन करणारा, कवींना भुरळ घालणारा असा हा आनंदधन श्रावण. वातावरणातील प्रसन्नतेने आशादायी बदलांची सकारात्मक चाहूल देणारा श्रावण. ज्येष्ठ हिंदी कवी हरिवंशराय बच्चन म्हणतात,
है नियति-प्रकृति की ऋतुओं में संबंध कहीं कुछ अनजाना,
अब दिन बदले, घड़ियाँ बदलीं, साजन आए, सावन आया।
नव्या उत्सवांचे नवे रंग, नवे उमंग हे आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य. ‘घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे’ म्हणत आनंदाची देवाण-घेवाण करणे हा तिचा मूलमंत्र आहे. विविध रंगांनी नटलेला मनभावन श्रावण आपल्यासाठी हा संदेश घेऊन पुन्हा आला आहे.