सुमन कल्याणपूर यांना गदिमा पुरस्कार जाहीर
By Admin | Published: November 25, 2015 12:42 AM2015-11-25T00:42:44+5:302015-11-25T00:42:44+5:30
साहित्य, चित्रपट आणि कलाक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर झाला आहे.
पुणे : साहित्य, चित्रपट आणि कलाक्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर झाला आहे. गीतरामायणकार गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात गदिमांच्या ३८ व्या स्मृतीदिनानिमित्त १४ डिसेंबर रोजी या व इतर पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते होणार आहे.
गदिमांच्या पत्नी विद्या माडगूळकर यांच्या स्मरणार्थ गेल्या दहा वर्षांपासून गदिमा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘गृहिणी सखी सचिव’ पुरस्कार आंतरराष्ट्रीय किर्तीचे अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या पत्नी वसुंधरा जाधव यांना देण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून दिला जाणारा ‘विद्या प्रज्ञा पुरस्कार’ भारतातील युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांना जाहीर झाला आहे. नव्या उभारीच्या प्रतिभावंतांना स्फूर्तीदायक ठरलेला चैैत्रबन पुरस्कार कथा, पटकथा, गीतकार आणि दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना जाहीर झाला आहे.
शालांत परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास दर वर्षी प्रतिष्ठानच्या वतीने अमरावती केंद्रांतर्गत अकोला जिल्ह्यातील बाल शिवाजी माध्यमिक विद्यालयाचा मंगलसिंग पाकळ याला जाहीर झाला आहे. त्याने मराठी विषयात १०० पैैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. या कार्यक्रमानंतर स्वरानंद प्रतिष्ठान प्रस्तुत ‘रिमझिम स्वरांची’ हा सुमन कल्याणपूर यांनी पूर्वी ध्वनिमुद्रित केलेल्या गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. (प्रतिनिधी)
सुमन कल्याणपूर यांचा जन्म १९४३ मध्ये बांगलादेशातील ढाका शहरात झाला. १९५४ मध्ये ‘दरवाजा’ या चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीला ख-या अर्थाने सुरुवात झाली. त्यांनी तब्बल ७४० हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. अजहू ना आए, मेरे संग गा, दिल ने फिर याद किया अशी त्यांनी गायलेली अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत. त्यांनी मराठी, गुजराती, कन्नड इत्यादी ९ भाषांमध्ये कल्याणपूर गायल्या आहेत. लिंबलोण उतरू कशी, दहावीस असती का रे, देव दया तुझी ही गाणीही लोकप्रिय ठरली आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे सुमन कल्याणपूर यांना २००९ मध्ये लता मंगेशकर सन्मानाने गौैरवण्यात आले.