एका पायावर तो पळाला १० किलोमीटर...पुण्यातल्या तरुणाची प्रेरणादायी कहाणी नक्की वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 04:50 PM2018-10-10T16:50:21+5:302018-10-10T17:54:58+5:30
नुकत्याच पुण्यात झालेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत चर्चा सुरु आहे ती जावेद चौधरी या तरुणाची.
पुणे : जिद्द, चिकाटी हे शब्दही ज्याच्यापुढे फिके पडतील अशा एक तरुणाची ही कथा. नुकत्याच पुण्यात झालेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत चर्चा सुरु आहे ती जावेद चौधरी या तरुणाची. एका पायाच्या जोरावर जावेदने थोडेथोडके नव्हे तर १० किलोमीटरचे अंतर पार केले आणि त्यानंतर झिंगाट गाण्यावर केलेला जल्लोष सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आम्ही जाऊन जावेदची भेट घेतली आणि समोर आला त्याचा असामान्य संघर्ष.
जावेद जेमतेम २४ वर्षांचा. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे त्याचे मूळ गाव. वडील म्हशीचे तर आई गृहिणी आहे. त्याच्या एकत्र कुटुंबात त्याच्याशिवाय कोणीही विज्ञान शाखेतही प्रवेश घेतलेला नाही. २०१५साली अॅग्रीकल्चरचे शिक्षण घेताना त्याचा अपघात झाला आणि त्यात एक पाय काढावा लागला. पण या आकाशाएवढ्या संकटाला घाबरून जाईल तो जावेद कसला ! त्याने अपघातानंतर शिक्षण पूर्ण केलेच पण बाईक स्टंट, रॅप्लिंगही शिकला. त्याआधी तो प्रवीण असलेल्या नृत्य कलेचे प्रशिक्षण देणेही त्याने सुरु केले. याच काळात त्याची गाठ पडली ती चेअर बास्केटबॉलशी. अपघातापूर्वी या खेळाचे नावही त्याने कधी ऐकले नव्हते. पण आता तो खेळात भारताचे नेतृत्व करणार आहे.आज त्याला त्याचा अपघात दुर्दैव न वाटता आयुष्याचा महत्वाचा टप्पा वाटतो. आयुष्य संपल्यावरही आपल्याला जर आपली आठवण राहावी असे वाटत असेल तर मेहनत घ्यायलाच हवी असे त्याला वाटते.
मॅरेथॉनमध्ये धावण्याची त्याची कहाणी तर रंजक आहे. संबंधित संस्थेने त्याला स्पर्धेविषयी कल्पना दिली. मात्र बास्केटबॉल स्पर्धेमुळे त्याला एकही दिवस सराव करता आला नाही. हे सगळं होऊनही माघार न घेता तो १० किलोमीटर धावला. आज त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकजण त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.आयुष्यात या मागील तीन वर्षांत घडलेल्या बदलांबाबत तो सकारात्मक दृष्टीने बघतो. 'माणसाचा जन्म एकदाच मिळतो. त्यामुळे जे आहे त्यात जास्तीत जास्त जग अनुभवा. थोडीशी मेहनत लागेल पण आयुष्य अधिक सुंदर होईल' हे आपल्या कृतीमागचा मुख्य गाभा असल्याचे सांगताना जावेदचा चेहरा आत्मविश्वासाने लख्ख उजळलेला असतो.