मुंबईत हाय अलर्ट, सिद्धीविनायक मंदिरावर होऊ शकतो हल्ला
By admin | Published: January 22, 2015 11:24 AM2015-01-22T11:24:51+5:302015-01-22T11:29:53+5:30
बराक ओबामांच्या भारतभेटीच्या पार्श्वभूमीवर देशात दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली असून सिद्धीविनायक मंदिर त्यांचे 'लक्ष्य'असू शकते.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - प्रजासत्ताक दिनानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारतभेटीच्या पार्श्वभूमीवर भारतात दहशतवादी हल्ले होण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांचे चार गट भारतातील विविध राज्यांत घुसून हल्ला करण्याची शक्यता असून दहशतवाद्यांचा एक गट अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या 'सिद्धीविनायक मंदिरा'ला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
येत्या २८ जानेवारीपर्यंत मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याच कट रचला जात असून मुंबईसह राज्यभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून परदेशी नागरिकांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
आयबीने मुंबई व महाराष्ट्र पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार जमात-ऊल-दावा, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या चार दहशतवादी संघटनेचे दहशतवादी देशभरात हल्ले करण्याच्या तयारीत आहेत. त्यातील एक गट महाराष्ट्र, दुसरा राजस्थान, तिसरा उत्तर प्रदेश आणि चौथा ओदिशात घुसण्याच्या प्रयत्नात असल्याचे नमूद करण्यात आले आहे
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असून मंगळवारी मंदिरात दर्शनासाठी खूप गर्दी असल्याने हल्ल्यासाठी मंगळवारचा मुहूर्त साधला जाऊ शकतो.
दहशतवादी अब्दुल्लाह अल-कुरेशी हा दहशतवादी या गटाचा म्होरक्या असून नासीर अली, जबेद इक्बाल, मोबिद झेमान आणि शमशेर हे महाराष्ट्रात हल्ला करण्याची अधिक शक्यता आहे.