महाराष्ट्रातील उच्च शिक्षणातील संशोधनावर अधिक भर देणार - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2017 07:21 PM2017-09-04T19:21:11+5:302017-09-04T19:24:21+5:30
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षण कोंन्सिल (रुसा) ची बैठक आज उच्च व तंत्र शिक्षणंमत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत उच्च शिक्षणाची गुणवत्ता तसेच नजिकच्या काळात उच्च शिक्षणामध्ये करावयाच्या संशोधनाबाबत चर्चा झाली. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालये यांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने तेथील प्राध्यापक व शिक्षकांची अध्यापन कार्यक्षमता वाढविण्यावर अधिक भर देण्यावर सकारात्मक चर्चा झाली.
मुंबई, दि. ४- महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षण कोंन्सिल (रुसा) ची बैठक आज उच्च व तंत्र शिक्षणंमत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत उच्च शिक्षणाची गुणवत्ता तसेच नजिकच्या काळात उच्च शिक्षणामध्ये करावयाच्या संशोधनाबाबत चर्चा झाली. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालये यांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने तेथील प्राध्यापक व शिक्षकांची अध्यापन कार्यक्षमता वाढविण्यावर अधिक भर देण्यावर सकारात्मक चर्चा झाली, या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विकास करुन महाराष्ट्रातील विद्यापीठे देशात अग्रस्थानी आणण्याबाबत विचार झाला. महाराष्ट्रातील स्थानिक समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने संबंधित क्षेत्रामध्ये सखोल संशोधन करण्याची गरज असल्याची चर्चा करण्यात आली आणि त्या दृष्टीने या समस्यांचे निराकारण करण्यासाठी नियोजनपूर्वक संशोधनात्मक कार्यक्रम आखण्याचे ठरविण्यात आले. तसेच या अनुषंगाने बैठकीत मांडण्यात आलेल्या विविध प्रस्तावावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या बैठकीला उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, रुसा प्रकल्प संचालक मिता राजीवलोचन, उद्योगपती राम भोगले, बाबासाहेब आंबेडकर तंत्रनिकेतन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास गायकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, प्राचार्य मुक्तजा मटकरी, प्राचार्य भामरे, डॉ. अपूर्वा पालकर, तसेच सर्व रुसा सदस्य उपस्थित होते.