कामे केली असतील तर दुष्काळ जाहीर का केला? राज ठाकरेंचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 05:17 PM2019-05-13T17:17:15+5:302019-05-13T17:18:26+5:30
राज्यातील दुष्काळावर मी लोकसभेच्या प्रचारावेळी जे प्रश्न विचारले त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही उत्तर तरी दिले का, दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ठाणे : राज्यामध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. एवढी कामे केली असतील तर राज्य सरकारला दुष्काळ जाहीर का करावा लागला, असा खरमरीत सवाल राज ठाकरे यांनी केला. आधीच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तुमच्या सरकारमध्ये सिंचनाची काय कामं झाली, पैसा कुठे गेला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील दुष्काळावर मी लोकसभेच्या प्रचारावेळी जे प्रश्न विचारले त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही उत्तर तरी दिले का, दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मनसेच्या नेत्यांची आज ठाण्यामध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला संबोधित करण्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दुष्काळ, मराठा आरक्षण, नरेंद्र मोदींचे ढगाळ वातावरणाचे वक्तव्य आणि आंब्याच्या स्टॉलला तोडल्याविरोधात सडकून टीका केली. दुष्काळ दौऱ्यावर जाणार का, या प्रश्नावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. दुष्काळाची करुण परिस्थिती असते. दुष्काळी टुरिझम करण्यात अर्थ नाही, माझ्या हातात काही गोष्टी असत्या तर काही करू शकलो असतो. नुसतंच जायचं आणि बघून यायचं याला काय अर्थ आहे. तरीही दुष्काळी परिस्थितीची माहीती घेत असल्याचे राज म्हणाले.
तसेच राज्यातील टँकर लॉबी कोणाच्या आहेत ते तपासून घ्या. इथून बसून सारे काही दिसत नसते. त्यामागचे राजकीय कनेक्शन काय, राजकारणी, आमदार, खासदार जर टँकर लॉबीच्या मागे असतील तर ते त्यांचा धंदा चालविण्यासाठी पाणी येऊच देणार नाहीत. दुष्काळासाठी पाणी फाउंडेशन आणि इतर सामाजिक संघटना काम करतायत.
दुष्काळासाठी पाणी फाउंडेशन आणि इतर सामाजिक संघटना काम करत आहेत. अमीर खान चांगलं काम करत त्यांचं अभिनंदन सर्व जण करतायत, सरकार काय करतंय असा सवालही त्यांनी केला.