मित्रपक्ष सोबत न आल्यास काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्लान बी तयार, लढवणार एवढ्या जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 01:03 PM2019-02-14T13:03:08+5:302019-02-14T13:04:32+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचे आव्हान परतवून लावण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचे आव्हान परतवून लावण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. निवडणुकीत भाजपाविरोधी मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वंचित बहुजन आघाडी तसेच मनसेसोबत आघाडीच्या नेत्यांची चर्चाही सुरू आहे. मित्रपक्षांसाठी मिळून एकूण आठ जागा सोडण्याची तयारी आघाडीने केली आहे. मात्र नवे मित्र पक्ष सोबत न आल्यास ऐनवेळी कुठलाही गोंधळ उडू नये म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्लान बी तयार ठेवला आहे.
सद्यस्थितीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी, तसेच राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून बैठकांवर बैठका घेण्यात येत आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र प्रकाश आंबेडकर हे 12 जागांवर ठाम आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाल घटनेच्या चौकटीत आणण्यासाठीचा आराखडा देण्याची मागणी आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या ताठर भूमिकेमुळे आघाडीचे घोडे अडले आहे.
त्यामुळे मित्रपक्ष सोबत न आल्यास ऐनवेळी गोंधळ होऊ नये यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या प्लान बी तयार ठेवला आहे. त्यानुसार अन्य कुठल्याही पक्षासोबत आघाडी न झाल्यास काँग्रेस 26 तर राष्ट्रवादी काँग्रेस 22 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.