मोदींचं समर्थन केलेलं नाही, त्यांनी विमानांची किंमत सांगायलाच हवी; 'राफेल'वरून शरद पवारांचा वार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 04:51 PM2018-10-01T16:51:58+5:302018-10-01T17:59:07+5:30

राफेल विमानाची किंमत गुप्त का ठेवता? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला

im not justified pm modi in rafale row should give information about aircraft price in parliament says sharad pawar | मोदींचं समर्थन केलेलं नाही, त्यांनी विमानांची किंमत सांगायलाच हवी; 'राफेल'वरून शरद पवारांचा वार

मोदींचं समर्थन केलेलं नाही, त्यांनी विमानांची किंमत सांगायलाच हवी; 'राफेल'वरून शरद पवारांचा वार

Next

बीड: राफेल विमानाची किंमत गुप्त का ठेवता? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीप्रकरणी सरकार स्पष्टीकरण देणारच नसेल, तर आरोप होतच राहणार. त्यामुळे सरकारनं राफेल विमान खरेदीबद्दलची माहिती संसदेत द्यावी, अशी मागणी पवार यांनी बीडमध्ये बोलताना केली. राफेल प्रकरणात आपण मोदींचं समर्थन केलं नसल्याचंही ते म्हणाले. बीडमध्ये राष्ट्रवादीचा विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पवार यांनी राफेल विमान खरेदीबद्दल भाष्य केलं.

राफेल कराराबद्दलच्या शरद पवारांच्या विधानावर नाराजी व्यक्त करत ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या तारीक अन्वर यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर बोलताना मी राफेल करारावरुन होणाऱ्या आरोपांबद्दल पंतप्रधान मोदींचं समर्थन केलं नाही, असं स्पष्टीकरण पवार यांनी दिलं. 'मनमोहनसिंग सरकारच्या काळात राफेल विमान ६५० कोटी रुपयांना खरेदी केले होते. मोदी सरकारने हेच विमान १६०० कोटी रुपयांना खरेदी केले. याचे समर्थन मी अजिबात केलेले नाही. ६५० कोटींचे १६०० कोटी का झाले, याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं द्यावं. याची सर्वपक्षीय चौकशी व्हावी, अशी मागणी संसद सदस्यांनी केली आहे. बोफोर्सची चौकशी करा म्हणणारे राफेलच्या बाबतीत का गप्प आहेत?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

याआधी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी राफेल खरेदीवर भाष्य केलं होतं. या प्रकरणावर सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये मोदींच्या हेतूविषयी शंका नाही, असं म्हणत पवारांनी मोदींची अप्रत्यक्षरीत्या पाठराखण केली होती. 'राफेलवरून मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. मात्र मुळात या कराराबाबत योग्य ती माहिती समजावून घेणं आवश्यक आहे. देशाला राफेल विमानांची गरज आहे, राफेल विमानं उत्तम आहेत. तरीही विरोधक संसदीय समिती स्थापनेची मागणी करत असतील, तर सरकारनं समिती स्थापन करून याची चौकशी करावी. विमानाच्या तांत्रिक बाजू जाहीर केल्यास तो देशाच्या सुरक्षेला धोका ठरेल. त्यामुळे शत्रूराष्ट्राला विमानाच्या तीव्रतेची जाणीव होईल. या प्रकरणावर सामान्य नागरिकांच्या मनामध्ये मोदींच्या हेतूविषयी शंका नाही, असं म्हणत पवारांनी मोदींची अप्रत्यक्षरीत्या पाठराखण केली होती.

Web Title: im not justified pm modi in rafale row should give information about aircraft price in parliament says sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.