भौतिकशास्त्रातील नोबेल विजेत्यांना भारतीय शास्त्रज्ञांचेही पाठबळ, संजीव धुरंधर यांचे महत्त्वाचे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 09:26 PM2017-10-03T21:26:18+5:302017-10-03T21:34:24+5:30
गुरुत्वीय लहरींच्या संशोधनासाठी मिळालेल्या भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या तीन शास्त्रज्ञांना तब्बल ३७ भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनाचे पाठबळ मिळाले आहे. पुण्यातील आयुकातील ज्येष्ठ खगोल भौतिक शास्त्रज्ञ संजीव धुरंदर यांचा यामध्ये मोलाचा वाटा असून या प्रकल्पामध्ये आयुकातील नऊ शास्त्रज्ञांनी महत्वाचा सहभाग घेतला आहे.
- अविनाश थोरात
पुणे - गुरुत्वीय लहरींच्या संशोधनासाठी मिळालेल्या भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या तीन शास्त्रज्ञांना तब्बल ३७ भारतीय शास्त्रज्ञांच्या संशोधनाचे पाठबळ मिळाले आहे. पुण्यातील आयुकातील ज्येष्ठ खगोल भौतिक शास्त्रज्ञ संजीव धुरंदर यांचा यामध्ये मोलाचा वाटा असून या प्रकल्पामध्ये आयुकातील नऊ शास्त्रज्ञांनी महत्वाचा सहभाग घेतला आहे.
गुरुत्वीय लहरींच्या भारतात सुरु असणाºया संशोधनामध्ये आणि निरिक्षणामध्ये आयुकाच्या संजीव धुरंधर यांनी मोलाची कामगिरी केली. धुरंधर हे १९८७ पासून यावर काम करत आहेत, १९८९ मध्ये त्यांनी आयुकामध्ये काम सुरु केले. गोंगाटासारख्या आवजामधून त्यांनी गुरुत्वाकर्षणाच्या तरंगांचे संकेत शोधणे हे त्यांचे मुख्य कार्य होते. या प्रकल्पासाठी डाटा अॅनालिसिसचे कामही त्यांनी केले. धुरंदर यांच्या अनेक विद्यार्थ्यांनीही यामध्ये आपला सहभाग नोंदविला. आयुकातील नऊ शास्त्रज्ञ लिगो लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आॅब्झर्व्हेटरीज) प्रकल्पासाठी काम करत होते. धुरंधर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर या विषयावरील ७० पेपर्स प्रसिध्द केलेले आहेत.
‘लोकमत’शी बोलताना संजीव धुरंधर म्हणाले, ‘‘ कोणत्याही शोधासाठी खूप मोठ्या प्रमाणावर यंत्रणेची गरज असते. लिगो प्रकल्पासाठीही भारतीय शास्त्रज्ञांचे मोठे योगदान राहिले आहे. पण नोबेलविजेत्या तीन शास्त्रज्ञांचे योगदान मोठे होते. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ ते या प्रकल्पावर काम करत आहेत. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी त्यासाठी वेचले.
धुरंधर म्हणाले, ‘‘मी गेल्या ३० वर्षांपासून या प्रकल्पावर काम करत आहे. सुरूवातील या प्रकल्पाला कोणीही गांभिर्याने घ्यायला तयार नव्हते. नोबेल मिळाल्याने लायगो इंडियालाही बळ मिळणार आहे. शासन या प्रकल्पाकडे अधिक गांभिर्याने पाहिल. त्यामुळे निधीमध्येही वाढ होईल. सामाजिक पातळीवरही या प्रकल्पाला यश मिळून अधिकाधिक विद्यार्थी या शाखेकडे वळू शकतील.
कल्पनाही केली नाही असे आश्चर्यजनक शोध लागू शकतात : संजीव धुरंधर
गुरुत्वीय लहरींचा शोध हा शतकातील सर्वात मोठा शोध आहे. नोबेल पारितोषिकामुळे त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. विश्वाची निर्मिती आणि सुरुवात तसेच इतर अनेक शोधांची वाट या यशामुळे मोकळी झाली आहे. खगोलविज्ञानाच्या प्रगतीचे नवे दालन यामुळे उघडले आहे. गॅलिलीओच्य काळात आॅप्टीकल अॅस्ट्रॉनॉमी होती. त्यानंतर ७० वर्षांपूर्वी रेडीओ अॅस्ट्रॉलॉजीचे युग सुरू झाले. त्यामुळे अनेक नवीन शोध लागले. गुरुत्वलहरींच्या शोधांमुळे आता अनेक आश्चर्यजनक शोध लागू शकतात, ज्याची आपण कल्पनाही केली नाही.