निष्काम सेवा देणारे इंद्रायणीचे स्वच्छतादूत
By admin | Published: April 3, 2017 02:04 AM2017-04-03T02:04:40+5:302017-04-03T02:04:40+5:30
नदी प्रदूषणमुक्त ठेवण्याची निष्काम सेवा येथील पाच स्वच्छतादूत गेली साडेतीन वर्षे करीत आहेत.
राजेंद्र काळोखे,
देहूगाव- जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची कर्मभूमी व जन्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र देहूगाव येथील इंद्रायणी नदीपात्र कायमच स्वच्छ ठेवण्याचा व नदी प्रदूषणमुक्त ठेवण्याची निष्काम सेवा येथील पाच स्वच्छतादूत गेली साडेतीन वर्षे करीत आहेत. इंद्रायणीमातेची सेवा करण्याचे काम करण्याचे काम स्वच्छतादूत पाच जण करीत आहेत.
तळेगाव दाभाडे येथील फ्रेंडस आॅफ नेचर संस्थेने इंद्रायणीत जाणीवपूर्वक वाढविलेले महाशीर जातीचे मासे हे देहूचे वैभव आहे. ते जोपासण्याचे कामही करीत हे स्वच्छतादूत करीत आहेत. त्यांच्या कामाची चिकाटी पाहून येथील काही सामाजिक संस्थाही या कामात आपापल्या सोयीनुसार सहभागी होत असून, मदतीचा हातही पुढे करीत आहेत. हे स्वच्छतादूत लोकहितासाठी व नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि महाशीर माशांच्या संरक्षणासाठी काम करीत आहे. हे स्वच्छता वेडे पाच जण आहेत सोमनाथ मुसुडगे, निवृत्तीमहाराज मोरे, रावसाहेब काळोखे, नाना वाघमारे व भीमराव भिंगारदिवे. या कामाची प्रेरणी श्री संत तुकाराम महाराज व स्वच्छतेचे पुरस्कर्ते गाडगेबाबा यांच्याकडून मिळाल्याचे ते सांगतात.
ते भल्या पहाटे आपले घरची कामे उरकून देवदर्शन करून श्री संत तुकाराम महाराज मंदिराच्या मागील घाटावर जमतात. येथूनच आपल्या दिवसाच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करतात. येथून वैकुंठगमण मंदिरापर्यंतचा सुमारे दोनशे मीटरचा घाट साफ करतात. यासाठी सुरुवातीला शेतकऱ्यांकडील दाताळे या अवजाराचा वापर करून या वस्तू बाहेर काढल्या जातात. घाटावर लावण्यात आलेल्या कचरा कुंडीमध्ये टाकल्या जातात.
>इंद्रायणी उगमस्थान स्वच्छतेचा संकल्प
भविष्यात इंद्रायणी नदीचा उगमस्थान असलेले कुरवंडे गाव, नागफणी, खंडाळा येथे गोमुख बांधून येथील नदीच्या स्वच्छतेला सुरवात करणाचा व तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ असलेल्या संगमस्थळापर्यंत इंद्रायणीला प्रदूषणमुक्त व स्वच्छ करण्याचा मनोदय असल्याचे सोमनाथ मुसुडगे यांनी सांगितले.
देहूला वर्षातून तीन मोठ्या यात्रा भरतात. या वेळी व शेतीसाठी पाणी कमी पडल्यास पाटबंधारे विभागाच्या वतीने आंद्रा व वडीवळे धरणातून वेळोवेळी पाणी सोडले जाते. या पाण्याबरोबरच वाहून येणारी जलपर्णी वेळोवेळी बाहेर काढून नष्ट केली जाते. हे जोखमीचे काम मदतीशिवाय करणे अवघड असतानाही ही मंडळी आपल्या परिने करीत असतात. हे काम करण्यासाठी त्यांना आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते. काही दानशूर व्यक्ती किंवा संस्था यांच्या मदतीने हे साहित्य मिळविले जाते.
पालकमंत्री गिरीश बापट हे त्यांच्या बहिणीच्या अस्थी विसर्जन करण्याच्या निमित्ताने गावात आले असता त्यांनी या स्वच्छतादूत पाच जणांची कामाची दखल घेऊन दोन हजार रुपये साहित्य खरेदीसाठी दिले होते. स्वच्छतादूतांना येथील गजराज बोट क्लबचे संचालक गजानन काळोखे व त्यांचे कर्मचारी सोमनाथ पेठेकर, बारक्या पवार हे नेहमीच सहकार्य करतात. काढलेला कचरा ग्रामपंचायतीचे कर्मचारी वाहून नेतात. देहूकर नागरिकही या कामात मदत देत आहेत, असेही स्वच्छतादृतांनी सांगितले.