पुण्यातील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये अर्भक भाजल्याचं प्रकरण; बाळाचा उपचारादरम्यान मध्यरात्री मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 09:38 AM2017-09-28T09:38:13+5:302017-09-28T11:32:02+5:30

बाळाचा बुधवारी मध्यरात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचं समजतं आहे.

Infant Bhalaya case in Vatsalya hospital; Midnight mortality during childcare | पुण्यातील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये अर्भक भाजल्याचं प्रकरण; बाळाचा उपचारादरम्यान मध्यरात्री मृत्यू

पुण्यातील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये अर्भक भाजल्याचं प्रकरण; बाळाचा उपचारादरम्यान मध्यरात्री मृत्यू

Next
ठळक मुद्देवात्सल्य हॉस्पिटलमध्ये काचेच्या पेटीला आग लागल्याने त्यामध्ये असलेलं नवजात बालक गंभीर जखमी झालं होतं.या बाळाचा बुधवारी मध्यरात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचं समजतं आहे.

पुणे- पुण्यातील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये काचेच्या पेटीला आग लागल्याने त्यामध्ये असलेलं नवजात बालक गंभीर जखमी झालं होतं. हे बालक 90 टक्के भाजल्याचं समजलं होतं. या बाळाचा बुधवारी मध्यरात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचं समजतं आहे. हा नवजात अर्भकावर उपचार करण्यासाठी त्याला दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं होतं. तेथे उपचार सुरू असताना मध्यरात्री त्या बाळाचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. 

बुधवार पेठेतील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सकाळी काचेच्या पेटीला आग लागून आतमधील नवजात बालक ९० टक्के भाजलं होतं. याप्रकरणी डॉ. गौरव चोपडे यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाला नंतर दुसऱ्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्या बाळाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर सर्वतोपरी उपचार सुरू होते. दरम्यान या प्रकरणी विजेंद्र विलास कदम (वय ३५, रा. शुक्रवार पेठ) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

बालक भाजल्याप्रकरणी हॉस्पिटल बंद ठेवण्याचे आदेश

काचेच्या पेटीला आग लागून आतील नवजात बालक गंभीर जखमी झाल्याप्रकरणी महापालिकेने सुमोटो कारवाईचा बडगा उचलला आहे. वात्सल्य हॉस्पिटल पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेच्या आरोग्य अधिका-यांनी बजावले आहेत. महापालिकेच्या सहायक आरोग्याधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वात्सल्य हॉस्पिटल २७ सप्टेंबर २०१७ पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. हॉस्पिटलच्या इन्क्युबेटरला आग लागून बालक जखमी झाल्याचा प्रकार गंभीर असून यामध्ये हॉस्पिटलचा निष्काळजीपणा आढळून येत आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही नवीन रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेऊ नये, तसे केल्याचे आढळून आल्यास आपणास जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर संबंधित डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नोंदणी रद्द करण्याचे अधिकार
बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अ‍ॅक्टनुसार सर्व हॉस्पिटलची महापालिकेकडे नोंदणी केली जाते. पुणे शहरात ६६८ नोंदणीकृत हॉस्पिटल आहेत. हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, बांधकाम परवाना, अग्निशमन दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र, व्यावसायिक कर नोंदणी आदी कागदपत्रांची तपासणी करून त्यांची पालिकेकडे नोंदणी केली जाते. हॉस्पिटलकडून रुग्णांच्या उपचारामध्ये कुचराई झाल्याचे निर्दशनास आल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार पालिकेला आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेने हॉस्पिटलबरोबर शहरातील डॉक्टरांचीही नोंदणी करण्याची प्रक्रिया राबविली आहे. याअंतर्गत ४ हजार ५०० डॉक्टरांची नोंदणी पालिकेकडे झाली आहे.
 

Web Title: Infant Bhalaya case in Vatsalya hospital; Midnight mortality during childcare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.