प्रेरणादायी आणि कौतुकास्पद..! ‘एमपीएससी ’मध्ये सामान्य कुटुंबातील मुलांची सर्वाधिक बाजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 11:57 AM2019-02-16T11:57:50+5:302019-02-16T12:03:16+5:30

स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी दिल्ली, मुंबई, पुण्याला जावे लागते, महागडे क्लास लावावे लागतात, खूप खर्च करावा लागतो, अशा अनेक गैरसमजांना दूर करत त्यांनी हे यश मिळवले आहे. 

Inspirational and appreciative ..! highest sucees 'MPSC' from by children general family | प्रेरणादायी आणि कौतुकास्पद..! ‘एमपीएससी ’मध्ये सामान्य कुटुंबातील मुलांची सर्वाधिक बाजी 

प्रेरणादायी आणि कौतुकास्पद..! ‘एमपीएससी ’मध्ये सामान्य कुटुंबातील मुलांची सर्वाधिक बाजी 

Next
ठळक मुद्देस्व अभ्यासावर अधिक भर : प्रेरणादायी निकाल प्राथमिक शिक्षकाने बांधावर अभ्यास करत उपजिल्हाधिकारी पदाचा मान पटकाविलापरिस्थिती नसल्याने ४ वर्षे शिक्षण बंद करावे लागलेल्या स्वाती दाभाडे मुलींमधून राज्यातून पहिल्याकेवळ मॉक इंटरव्हयूसाठीच क्लासचा आधार 

पुणे : यंदाच्या राज्यसेवा परीक्षेत सामान्य कुटुंबातील तसेच ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे प्रमाण सर्वाधिक आहे. महागडे क्लास टाळून स्व अभ्यासावर भर देत त्यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेकांना या निकालातून प्रेरणा घेता येईल अशी भावना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या १३६ पदांचा निकाल गुरूवारी रात्री जाहीर करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत अनेकांनी यश मिळवल्याचे या निकालातून दिसून येत आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी दिल्ली, मुंबई, पुण्याला जावे लागते, महागडे क्लास लावावे लागतात, खूप खर्च करावा लागतो. बीए, बीकॉमच्या विद्यार्थ्यांना यश मिळणे अवघड असते अशा अनेक गैरसमजांना दूर करत त्यांनी हे यश मिळवले आहे. 
परिस्थिती नसल्याने ४ वर्षे शिक्षण बंद करावे लागलेल्या स्वाती दाभाडे या मुलींमधून राज्यातून पहिल्या आल्या. शिकवणी घेत बीकॉमचे शिक्षण घेत त्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी या छोटया गावातील महेश जमदाडे या प्राथमिक शिक्षकाने बांधावर अभ्यास करत उपजिल्हाधिकारी पदाचा मान पटकाविला आहे. ते राज्यातून मागासवर्गीयातून प्रथम आले. 
अनुसूचित जातीतून प्रथम आलेल्या दर्शन निकाळजे यांची घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही त्यावर मात करीत यश मिळवले आहे.  दर्शन निकाळजे यांनी सिंहगड टेक्निकल इन्स्टियूटमधून मेकॅनिकल इंजिनिअरींगची पदवी घेतली. इंजिनिअरींग करत असतानाच स्पर्धा परीक्षेकडे जाण्याचे डोक्यात होते. मात्र स्पर्धा परीक्षेच्या प्रत्यक्ष अभ्यासाला सुरूवात मात्र इंजिनिअरींग झाल्यानंतर २०१६ पासून केली. दररोज ६ ते ८ तास अभ्यास त्यांनी केला. काही दिवस अभ्यासिकेमध्ये जाऊन अभ्यास केला, त्यानंतर मात्र घरीच राहून अभ्यास केल्याचे निकाळजे यांनी सांगितले. मागील वर्षी त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली होती. मात्र त्यांनी एक्सटेंशन घेऊन राज्यसेवेची तयारी केली. 
वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी उपजिल्हाधिकारी बनलेल्या पूजा गायकवाड यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून बीए केले. बीए करीत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला होता. मागील वर्षी दिलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेत नायब तहसीलदार निवड झाली होती, त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्या उपजिल्हाधिकारी बनले. त्यांचे वडील सीएसडीमधून निवृत्त झाले आहेत.  
.................
आईच्या प्रेरणेतूनच स्पर्धा परीक्षांकडे वळलो
माझी आई शाळेत शिपाई म्हणून कार्यरत आहे, मी अधिकारी व्हावे अशी तिची मनापासून इच्छा होती. आईच्या प्रेरणेतूनच मी प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेतला. वडिलांचे निधन झाल्यानंतर घराची सर्व जबाबदारी आईनेच सांभाळली. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना माझ्या इंजिनिअरींगच्या शिक्षणाचा प्रशासनामध्ये अधिकाधिक उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करेन.
दर्शन निकाळजे, उपजिल्हाधिकारीपदी निवड
........................................
लोक केंद्रीत कामाला प्राधान्य देईन
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना स्व अभ्यासावर अधिक भर दिला. कुठल्याही अभ्यासिकेत न जाता घरी राहूनच अभ्यास केला. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना प्रशासनात जास्तीत जास्त सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 
पूजा गायकवाड, उपजिल्हाधिकारीपदी निवड
....................................
केवळ मॉक इंटरव्हयूसाठीच क्लासचा आधार 
राज्यसेवेच्या १३६ पदांवर निवड झालेल्या बहुतांश उमेदवारांनी स्व अभ्यासावर भर दिला आहे. यातील बहुतांश जणांनी केवळ मॉक इंटरव्हयूसाठी क्लासचा आधार घेतला आहे, तीही मोफत सुविधा उपलब्ध आहे म्हणून. राज्यसेवेची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बहुतांश क्लास चालकांकडून मोफत मॉक इंटरव्हयूचे आयोजन केले जाते. मोफत असल्याने अनेक अशा सर्वच क्लासच्या मॉक इंटरव्हयूला जातात. मात्र प्रत्यक्षात त्यांनी या क्लासमधून शिक्षण घेतलेले नसते. यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये महागडे क्लास न लावताही यश मिळविता येत असल्याचे या निकालातून दिसून येत आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू इच्छिणाºया विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत प्रेरणादायी निकाल आहे.
- कैलास माने, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा विद्यार्थी

Web Title: Inspirational and appreciative ..! highest sucees 'MPSC' from by children general family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.