आंतरभारती शिक्षण मंडळाचे सचिव पाटोळे फरार!
By admin | Published: May 10, 2014 08:43 PM2014-05-10T20:43:13+5:302014-05-10T20:51:39+5:30
आंतरभारती शिक्षण मंडळाचे सचिव एम. एस. पाटोळे यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्याध्यापिका आत्महत्या प्रकरण : कोणत्याही क्षणी होणार अटक
कोल्हापूर : वसंतराव चौगुले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या दत्तात्रय जाधव (५५) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून आंतरभारती शिक्षण मंडळाचे सचिव एम. एस. पाटोळे यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी पाटोळे यांचा पोलीस शोध घेत असून, ते मिळून आलेले नाहीत. त्यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांचा ठावठिकाणाही सापडत नाही. कोणत्याही क्षणी त्यांना अटक करणार असल्याचे शाहूपुरीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अमृत मराठे यांनी दिली.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये पाटोळे यांनी नातेवाईक लिपिकाला वाचविण्यासाठी जाधव यांना दंड भरण्यासाठी तगादा लावल्याचे पुढे येत आहे. त्यासाठी पोलीस संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे जाब-जबाब घेत आहेत. पाटोळे यांच्या विरोधात जाधव यांचे पती दत्तात्रय जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी पोलीस अत्यंत बारकाईने तपास करीत असल्याचे तपास अधिकारी मराठे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)