ऑडीओ क्लिप व्हायरल: राष्ट्रवादीचे माजी आमदार म्हणतात 'वंचित'चं चालवा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 03:46 PM2019-11-09T15:46:20+5:302019-11-09T15:53:43+5:30
वाघचौरे यांनी पक्षात राहून सुद्धा पक्षाच्या विरोधात काम केल्याचे आरोप करण्यात येत होते.
मुंबई : विधानसभा निवडणुकीत पक्षात राहून कार्यकर्त्यांना विरोधातील उमेदवाराला मतदान करण्याचे सांगतानाची राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. तर वाघचौरे यांनी राष्ट्रवादीत राहून पक्षाविरोधात काम केले असल्याचे आरोप सुद्धा पैठण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता गोर्डे यांनी केले आहे. त्यामुळे पैठण विधानसभा मतदारसंघात निवडणुकीनंतर सुद्धा राजकरण तापताना दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीत पैठण मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाकडून दोन वेगवेगळ्या उमेदवारांना 'एबी' फॉर्म दिल्याने चर्चेचा विषय बनला होता. मात्र निवडणूक अधिकारी यांनी दत्ता गोर्डे यांची उमेदवारी अधिकृत असल्याचे जाहीर केल्याने माजी आमदार संजय वाघचौरे यांचा अर्ज बाद झाला होता. त्यामुळे नाराज असलेले वाघचौरे यांनी पक्षात राहून सुद्धा पक्षाच्या विरोधात काम केल्याचे आरोप करण्यात येत होते. त्यातच आता त्यांची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.
व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लिपमध्ये वाघचौरे कार्यकर्त्यांना बोलताना,वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजय चव्हाण यांना मतदान करण्याचे सांगत असल्याचा दावा केला जात आहे. तर वाघचौरे हे राष्ट्रवादी पक्षात असून सुद्धा त्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले आहे. त्यामुळेचं राष्ट्रवादीला पैठणमध्ये पराभव स्वीकारावा लागला असल्याचा आरोप दत्ता गोर्डे यांनी केला आहे.
संजय वाघचौरे यांचा इतिहास पाहिला तर त्यांना स्वता:ला मिळालेली उमेदवारी सोडली तर त्यांनी आतापर्यंत कोणतेही निवडणूक असू द्या, पक्षाच्या विरोधातच काम केले आहे. तसेच विजयाची अपेक्षा होती म्हणूनचं मला पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यामुळे वाघचौरे यांनी यावर बोलूच नाही. - दत्ता गोर्डे ( राष्ट्रवादी उमेदवार )
दुपारी पक्षात येऊन संध्याकाळी उमेदवारी मिळालेल्या लोकांनी माझ्यावर आरोप करणे चुकीचे आहे. त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या. अशा लोकांना महत्व देऊ नयेत. - संजय वाघचौरे ( माजी आमदार राष्ट्रवादी )