आयपीएस बदली रॅकेट; संदीप बिष्णोई यांची चौकशी; दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरही गुन्हे शाखेकडून तपास सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 03:24 AM2017-10-10T03:24:00+5:302017-10-10T03:25:04+5:30
आयएएस, आयपीएस अधिका-यांना त्यांच्या मनाप्रमाणे बदल्या करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणा-या रॅकेटचा गुन्हे शाखेने जून महिन्यात पर्दाफाश केला होता.
मुंबई : आयएएस, आयपीएस अधिका-यांना त्यांच्या मनाप्रमाणे बदल्या करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणा-या रॅकेटचा गुन्हे शाखेने जून महिन्यात पर्दाफाश केला होता. या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरही गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे. याच प्रकरणात अटकेत असलेला महानंद डेअरीचा महाव्यवस्थापक विद्यासागर हिरमुखेच्या संपर्कात आलेले एसआरपीएफचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई यांच्याकडे सोमवारी चौकशी करण्यात आली. या प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.
नेत्यांसह मंत्र्यांच्या मदतीने आयपीएस अधिकाºयांना पाहिजे त्या ठिकाणी बदली करून देण्यासाठी हिरमुखे आणि त्याचे साथीदार पैसे घ्यायचे. सोलापूरचे उपायुक्त नामदेव चव्हाण यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात हिरमुखेसह (४७) रवींद्रसिंग महोबतसिंग यादव (५१), किशोर माळी (३८) आणि विशाल ओंबळे (४०) या चौघांना ३१ मे रोजी विमानतळ परिसरातील सहारा स्टारच्या खोली क्रमांक २०१२ मधून अटक केली होती. ही टोळी राज्य पोलीस दलातील अनेक अधिकाºयांच्या संपर्कात होती. त्यांच्यासह या प्रकरणात आणखी काही जणांना अटक केली आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणी ४७५० पानांचे दोषारोपपत्रही दाखल केले आहे. गुन्हे शाखेने हिरमुखे व साथीदारांचे मोबाइल पुढील तपासणीसाठी न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठविले होते. प्रयोगशाळेतून माहिती अहवाल हाती येताच गुन्हे शाखेने तपास सुरू ठेवला.
हिरमुखेच्या चौकशीतून बिष्णोर्इंचे नाव समोर आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाºयाने दिली. मात्र त्यांचा या प्रकरणाशी नेमका काय व कसा संबंध आहे, याची सखोल चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी बिष्णोई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
बिष्णोई यांच्याकडे केलेल्या चौकशीमुळे वरिष्ठांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे समजते. या प्रकरणी आणखी काही बड्या आयएस आणि आयपीएस अधिकाºयांची चौकशी करत त्यांचेही जबाब नोंदवणार असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.