जेईई मेन्स परीक्षेत पुण्याचा राज अगरवाल देशात दुसरा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 04:27 PM2019-01-19T16:27:07+5:302019-01-19T16:29:08+5:30
देशातील आयआयटी व इंजिनीअरिंग महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई (जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) मेन्स परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला.
पुणे : देशातील आयआयटी व इंजिनीअरिंग महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई (जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) मेन्स परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये पुण्याचा राज आर्यन अगरवाल याने १०० पर्सेन्टाइल मिळवून देशात दुसरा रँक मिळवला आहे.
राज आर्यन अगरवाल हा पुण्यातील महापालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याचे ८ वी पर्यंतचे शिक्षण रशियामध्ये झालेले आहे. त्यानंतर इयत्ता ९ वीपासून तो पुण्यात शिक्षण घेत आहे. त्याचे वडिल खाजगी कंपनीमध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. यंदाच्या वर्षीपासून जेईई परीक्षेच्या स्वरूपात मोठयाप्रमाणात बदल करण्यात आले आहेत. जेईई ही परीक्षा वर्षातून जानेवारी व एप्रिल अशी वर्षातून दोन वेळा घेतली जाणार आहे. यंदा ८ ते १२ जानेवारी २०१९ या कालावधीमध्ये ऑनलाइन घेण्यात आलेल्या जेईई मेन्सची ९ लाख २९ हजार १९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदा वर्षातूनन दोन वेळा परीक्षा घेतली जात असल्याने विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे त्यांना पर्सेन्टाइल देण्यात येत आहे. पर्सेन्टाइल याचा अर्थ इतके टक्के विद्यार्थी तुमच्या मागे आहेत. एप्रिलमध्ये आणखी एक जेईई परीक्षा होणार आहे. दोन्ही पैकी ज्या परीक्षेत चांगले पर्सेन्टाइल मिळाले आहेत, त्या आधारे त्या विद्यार्थ्याची रँक निश्चित केली जाणार आहे. महाराष्ट्रातून राज अगरवाल यांच्यासोबतच अंकित कुमार मिश्रा व कार्तिक चंद्रेश गुप्त यांना १०० टक्के पर्सेन्टाइल मिळाले आहेत. देशातून मध्यप्रदेशचा धु्रव अरोरा हा टॉप ठरला आहे.