फुकटात मिळणार जिओचा 4G स्मार्टफोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 11:44 AM2017-07-21T11:44:42+5:302017-07-21T15:32:52+5:30
रिलायन्स जिओनं प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी जगातला सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच केला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - रिलायन्सचा 4जी स्मार्टफोन मोफत असेल असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना जाहीर केले. अर्थात, कुठलीही गोष्ट मोफत दिली तर तिचा दुरुपयोग होतो असे सांगत, हे टाळण्यासाठी 1500 रुपये सुरक्षा अनामत म्हणून घेण्यात येणार असून तीन वर्षांनी ही रक्कम ग्राहकाला परत करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जिओ स्मार्टफोनमध्ये 12 भाषा देण्यात आल्या आहेत. या फोनमध्ये वायफाय, ब्लूट्यूथ, जीपीएस आणि यूएसबीच्या सुविधा आहेत.
जिओ स्मार्टफोन हा इतर स्मार्टफोनपेक्षा खूप पावरफूल आहे. जिओ म्युझिक, जिओ सिनेमा, जिओ टीव्ही हे फिचर्स आधीपासून या स्मार्टफोनमध्ये लोड करण्यात आले आहेत. या फोनवर 153 रुपयांत प्रत्येक महिन्याला फ्री व्हाइससह अनलिमिटेड इंटरनेट मिळणार आहे. जिओ 4 जी व्होल्ट फोनची इफेक्टिव्ह किंमत शून्य आहे. मात्र 1500 रुपयांचं सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागणार असून, तीन वर्षांनंतर पूर्ण रिफंड मिळणार आहे, अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली आहे. या फोनवर व्हॉइस कॉलिंग मोफत मिळणार आहे. जिओ फोन कोणत्याही टीव्हीला जोडता येऊ शकणार आहे.
रिलायन्स जिओच्या या फोनमध्ये 2.4 इंच डिस्प्ले आणि 512 एमबी रॅम असणार आहे. तसेच 4 जीबी इंटर्नल स्टोरेज सुविधा असेल. तर 128 जीबी मेमरी कार्डची सुविधाही देण्यात आली आहे. 2 मेगा पिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि VGA फ्रन्ट कॅमेरा असणार आहे. याचबरोबर या फोनमध्ये डेडिकेटेड की असणारी टॉर्च लाइट दिली आहे. तर 2000mAh इतकी बॅटरी सुद्धा असेल.
जिओच्या फोनवर दोन दिवसांचा इंटरनेट प्लॅन 24 रुपयांना मिळणार असून, आठवड्याचा प्लॅनसाठी 54 रुपये मोजावे लागणार आहेत. जिओ फोनच्या माध्यमातून तुम्हाला टीव्ही केबल पाहता येणार असून, त्यासाठी तुम्हाला दर महिन्याला 309 रुपयांचं रिचार्ज करावं लागणार आहे. जिओच्या व्हॉइस कमांडिंग फोनमध्ये डिजिटल पेमेंट करण्यासाठी विविध फिचर देण्यात आले आहेत. जिओ फोन हा भारतीय बनावटीचा आहे. जिओचा नवा फोन 24 ऑगस्टनंतर प्रीबुक करता येणार आहे, अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली आहे. प्रत्येक आठवड्याला 50 लाख फोन ग्राहकांसाठी उपलब्ध करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.