केजकर मुंदडा कुटुंबाला सत्तेत बसवणार की विरोधात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 12:20 PM2019-08-07T12:20:25+5:302019-08-07T12:53:56+5:30
माजी आमदार विमल मुंदडा यांनी केज मतदारसंघातून सर्वधिक वेळा आमदार राहण्याचा बहुमान मिळवला होता.
मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघे तीन महिने शिल्लक राहिले असून,सर्वच पक्षाचे इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघात राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. राष्ट्रवादीच्या दिवंगत माजी आमदार डॉ. विमल मुंदडा यांच्या अकाली निधनानंतर, २०१४ मध्ये नमिता मुंदडाच्या रूपाने मुंदडा कुटुंबातील आणखी एक चेहरा समोर आला. मात्र मोदी लाटेत त्या टिकाव धरू शकल्या नाहीत. आता पुन्हा राष्ट्रवादीकडून नमिता मुंदडाच्या नावाची चर्चा सुरु असून, केजकर पुन्हा मुंदडा कुटुंबाला सत्तेत बसवणार की विरोधात हे पाहणे महत्वाचे ठरेल.
माजी आमदार विमल मुंदडा यांनी केज मतदारसंघातून सर्वधिक वेळा आमदार राहण्याचा बहुमान मिळवला होता. १९९० पासून ते २००९ अशा पाचपैकी दोन वेळा भाजपाकडून तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विमल मुंदडा निवडून आल्या होत्या. मात्र २०१२ साली विमल मुंदडा यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे २०१२ साली झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज साठे निवडून आले. मात्र पुढे २०१४ मध्ये पुन्हा मुंदडा कुटुंबातून विमल मुंदडा यांच्या सूनबाई नमिता मुंदडा यांनी निवडणूक लढवली.
मात्र सलग पाच वेळा आमदारकी घरात असलेल्या मुंदडा कुटुंबीयांसाठी २०१४ निवडणूक अपेक्षाभंग करणारी ठरली. आणि भाजपच्या संगीता ठोंबरे यांनी नमिता मुंदडा यांचा पराभव करत ४० हजाराच्या मताधिक्याने निवडून आल्या. आता आगामी निवडणुकीत पुन्हा आमदार ठोंबरे विरोधात नमिता मुंदडा असे चित्र असणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. मात्र यावेळी केजची जनता मुंदडा कुटुंबाला सत्तेत बसवणार की विरोधात हे पाहणे महत्वाचे ठरेल.
लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर, या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना १ लाख १६ हजार मते मिळाली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांना ९५ हजार २९३ मतं पडली होती. म्हणजेच भाजपला केजमधून वीस हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी पुढचा प्रवास खडतर असणार आहे. मात्र केज विधानसभा निवडणूक चुरशी ठरणार हे नक्की.