‘कन्हैयाकुमार’सारख्या प्रवृत्तींना मिळावी ‘सजा-ए-मौत’
By admin | Published: May 22, 2017 03:42 AM2017-05-22T03:42:53+5:302017-05-22T03:42:53+5:30
अखंड भारतासाठी जवान रात्रंदिवस सीमेवर लढत असतात. त्यांच्या वेदना कोणालाही जाणून घेता येणार नाहीत. सैनिकांबाबत आपण जास्त भावूक होत आहोत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अखंड भारतासाठी जवान रात्रंदिवस सीमेवर लढत असतात. त्यांच्या वेदना कोणालाही जाणून घेता येणार नाहीत. सैनिकांबाबत आपण जास्त भावूक होत आहोत, अशी विधाने सर्रास केली जातात. सैनिक आणि देशाच्या सुरक्षेविरोधात बोलणारे अनेक कन्हैया कुमार आपल्यामध्येच आहेत. त्यांना ‘सजा-ए-मौत’च दिली पाहिजे, अशा परखड शब्दांमध्ये ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी निशाणा साधला.
बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे किशोरी आमोणकर व्यासपीठावर विक्रम गोखले यांना बलराज साहनी पुरस्कार, तर इंदुमती जोंधळे यांना कैफी आझमी पुरस्काराने गौरवण्यात आले. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुरेश टिळेकर, शिवानी हरिश्चंद्रे, प्रा. धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
गोखले म्हणाले, मनुष्यनिर्मित धर्म ही अफूची गोळी आहे. धर्म, जात असे घाणेरडे पाश बाजूला सारून जवान सीमेवर देशासाठी झटतात. त्यांना आपण विसरता कामा नये. जवान आणि शेतकऱ्यांमुळे आपण जिवंत आहोत. त्यांना विसरल्यास एखादे दिवशी झोपेत आपली मुंडकी कापली गेलेली असतील. आपल्या देशात लोकशाहीची मर्कटचेष्टा अनेक वर्षे सुरू आहे. भारत कधीच संपूर्ण समाजवादी देश होऊ शकणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.