कास पठार फुलले विविध रंगांच्या फुलांनी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2016 08:32 PM2016-09-04T20:32:57+5:302016-09-04T20:32:57+5:30
सातारा शहराच्या पश्चिमेस आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठारावर विविधरंगी फुले फुलली
आॅनलाईन लोकमत
पेट्री, दि. 4 - सातारा शहराच्या पश्चिमेस आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठारावर विविधरंगी फुले फुललेली दिसत असून, आतापर्यंत जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. रविवारीही पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. कास पठारावर एकूण १३२ पैकी सुमारे ७० प्रकारांच्या वनस्पती बहरल्या आहेत. साधारणपणे चाळीस टक्के फुलांचा बहर आलेला आहे.
दरम्यान, गेंद, तेरडा, सीतेची आसवे ही फुले बहुतांशी ठिकाणी चांगल्या प्रकारे फुललेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची फुले बहुतांशी ठिकाणी आली असून, अद्यापही विविधरंगी फुलांचे गालिचे पाहण्यास 10 ते 15 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. यासाठी सध्या पठारावर असलेले वातावरण कायम राहणे आवश्यक आहे.
कास पठारावर अबोलिमा, कापरू, नीलिमा, गेंद, भारंगी, सोनकी, चवर, दीपकांडी, टूथ ब्रश या वनस्पतींची फुले बहुतांशी ठिकाणी दिसून येत आहेत. तसेच कास पठारावरील राजमार्गावर असणाऱ्या कुमुदिनी तलाव परिसरात गेंद चांगला बहरलेला आहे. कुठे कुठे सीतेची आसवे, तेरड्याला देखील चांगला बहर येऊ लागला आहे. तसेच आठ वर्षांतून फुलणाऱ्या टोपली कारवीला काही ठिकाणी अत्यल्प प्रमाणात फुले आली असून, असेच पोषक वातावरण कायम राहिल्यास येत्या दोन-तीन आठवड्यांत चांगला बहर येण्याची शक्यता आहे.
अभ्यासकांना सवलत : अंजनकर
पठारावर सध्या चाळीस टक्के फुले फुलली असून, पंधरा सप्टेंबरपर्यंत असेच पोषक वातावरण राहिल्यास विविधरंगी फुलांचे गालिचे पाहण्यास मिळतील. तसेच मुख्याध्यापकांचा दाखला असल्यास शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षकांसाठी 20 रुपये शुल्क असेल. फुलांचा अभ्यास करण्यासाठी वेळेचे बंधन राहणार नाही. फुले पायदळी तुडविले जाणार नाहीत, याची सर्वांनी काळजी घेऊन नियमांचे पालन करावे. दर चार-पाच दिवसांला संबंधित ठिकाणाहून विविध अँगलद्वारे फोटो काढले जाणार आहेत. त्याद्वारे फुलांची काय स्थिती आहे, हे पाहिले जाणार आहे,ह्ण अशी माहिती उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
गेंद गवतवर्गीय वनस्पती...
गेंद ही गवतवर्गीय वनस्पती आहे. सप्टेंबर महिन्यात पठारी भागावर ही वनस्पती उगवते. उगवलेले गवत गेंद आहे, हे जेव्हा समजते तेव्हा त्याच्यावर पांढरा फेटा बांधल्याप्रमाणे तुरा येतो. तसेच ते इतर गवतातून वर येते. या गवताच्या दांड्यावर टोपीसारखा भाग येतो. म्हणून याला ह्यधनगर गवतह्ण असेही म्हणतात. पांढरा रंग फुलून भरपूर प्रमाणात दिसतो म्हणून गेंद म्हणतात.
सीतेची आसवे...
कास पठारावर तुरळक ठिकाणी सीतेची आसवे आली असून, गेंद सोबत या फुलांना पाहणे ही पर्यावरणप्रेमींसाठी पर्वणी आहे. सह्याद्री पठारावरच्या गवतामध्ये दडून बसलेली ही वनस्पती गवताबरोबर वाढते. अचानक फुले दिसून येतात, निळसर रंगाचे फूल त्यावर पांढऱ्या रंगांचा ठिपका असतो. ही वनस्पती फुलाच्या सुवासाने कीटकांना आकर्षित करते.