केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्राची धाव, 81 डॉक्टरांची टीम रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 10:55 AM2018-08-20T10:55:28+5:302018-08-20T11:11:51+5:30

Kerala Flood Relief : मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे 55 तर पुण्यातील ससून हॉस्पिटलचे 26 डॉक्टर्स अशी एकूण 81 डॉक्टरांची टीम आज एअर इंडियाच्या विमानाने केरळला रवाना झाली आहे. 

Kerala Flood Relief : 81doctors from maharashtra leave for help | केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्राची धाव, 81 डॉक्टरांची टीम रवाना

केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्राची धाव, 81 डॉक्टरांची टीम रवाना

Next

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे 55 तर पुण्यातील ससून हॉस्पिटलचे 26 डॉक्टर्स अशी एकूण 81 डॉक्टरांची टीम आज एअर इंडियाच्या विमानाने केरळला रवाना झाली आहे. 
केरळमध्ये मुसळधार पावसाने आणि पुराने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमध्ये आतापर्यंत 357 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 21 हजार कोटींहून अधिक किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सरकारी बचाव शिबिरात 20 लाख नागरिकांनी आश्रय घेतला असून पुराचे पाणी कमी झाल्यावर आता केरळमध्ये साथींच्या आजारांचा प्रसार होण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे देशाच्या विविध राज्यांतून डॉक्टर्सच्या टीम केरळला रवाना होत आहेत. सोमवारी सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे 55  आणि पुण्यातील ससून हॉस्पिटलचे 26 डॉक्टर्स अशी एकूण 81 डॉक्टर्सची टीम एअर इंडियाच्या विमानाने केरळला रवाना झाली आहे. 




दरम्यान, महाराष्ट्रातून रविवारी भारतीय वायुदलाच्या विमानाने राज्य शासनाकडून 30 टन साधनसामग्री पाठविण्यात आली आहे. पुन्हा आज पाच टन साहित्य रवाना करण्यात येणार आहे. तसेच, विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अन्न पाकिटे, दूध पावडर, ब्लँकेट्स, बेडशीट, कपडे, साबण, सॅनिटरी नॅपकिन्स आदी साहित्य पाठविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून 20 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा आधीच केली आहे. याचबरोबर, केरळ पूरग्रस्तांच्या मदतकायार्साठी एक नियंत्रण कक्ष मंत्रालयात कार्यान्वित करण्यात आला आहे. राज्य सरकारसोबत एमसीएचआय-क्रेडाई, राजस्थानी वेल्फेअर असोसिएशन, जितो इंटरनॅशनल, रिलायन्स रिटेल यासारख्या विविध संस्था, संघटना या कामात करत आहेत. बृहन्मुंबई महापालिका, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, राजशिष्टाचार आदी विभागही या मदत कार्यात गुंतलेले आहेत. 

केरळ भवनात 200 टन साहित्य
नवी मुंबईतल्या केरळ भवनमध्येही सुमारे 200 टन साहित्य जमा झाले आहे. त्यापैकी सुमारे दीडशे टन साहित्य नेव्ही व कोस्टगार्डच्या बोटीतून, तसेच रोरोमार्फत पाठविण्यात आले आहे. तसेच सौदी येथून केरळला निघालेल्या 20 व्यक्ती कोची विमानतळ बंद असल्याने शनिवारी मुंबई विमानतळावर उतरल्या होते. त्यांनी भवनमध्ये आश्रय घेतला आहे.

Web Title: Kerala Flood Relief : 81doctors from maharashtra leave for help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.