खालापूर स्मार्ट सिटी कागदावरच

By admin | Published: July 12, 2017 02:35 AM2017-07-12T02:35:40+5:302017-07-12T02:35:40+5:30

सिडकोच्या उदासीनतेमुळे खालापूर स्मार्ट सिटी प्रकल्प रखडला आहे

Khalapur smart city paper | खालापूर स्मार्ट सिटी कागदावरच

खालापूर स्मार्ट सिटी कागदावरच

Next

कमलाकर कांबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सिडकोच्या उदासीनतेमुळे खालापूर स्मार्ट सिटी प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पासाठी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात सामंजस्य करार झाला होता; परंतु मागील दोन वर्षांत यासंदर्भात कोणतीही कार्यवाही न झाल्याने सुमारे ७ हजार ९0९ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प केवळ कागदापुरताच सीमित राहिला आहे. या प्रकल्पाला विविध कारणांमुळे खो बसल्याने त्याचा अप्रत्यक्ष फटका नैना क्षेत्रातील नियोजित विकासाला बसण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
नैना योजनेअंतर्गत खालापूर स्मार्ट सिटीचा विकास करण्याचे सिडकोने जाहीर केले आहे. त्यासाठी ११ गावांचे एकत्रित प्रतिनिधित्व करणाऱ्या खालापूर नगरपंचायत, तसेच कलोटे मोकाशी व नादोडे या ग्रामपंचायतींनी एकूण ३५५0 हेक्टर जमिनीच्या लॅण्ड पुलिंगसाठी स्वेच्छेने तयारी दर्शविली आहे. खालापूर विशेष हेतू वहन कंपनीद्वारे (स्पेशल पर्पज वेहिकल) हा प्रकल्प हाताळण्याचे प्रस्तावित करण्यात आले. तर सिडको या प्रकल्पासाठी नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहे. ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा करार झाल्यानंतर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करून त्याला राज्य सरकारची मान्यता घेणे आवश्यक होते; परंतु मागील दीड वर्षांत यादृष्टीने कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे या प्रकल्पाला खो बसल्याचे बोलले जात आहे.
२३ गावांचा समावेश असलेल्या पहिल्या टप्प्याच्या विकास आराखड्याला राज्य सरकाने अलीकडेच मंजुरी दिली आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित २0१ गावांच्या विकास आराखड्यावर सिडकोने सूचना व हरकती मागवून त्यावर सुनावणी घेण्यात आली आहे. यासंदर्भातील अंतिम अहवाल मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. खालापूर स्मार्ट सिटी प्रकल्पातील ११ गावे नैनाच्या दुसऱ्या टप्प्यात येतात. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील विकास आराखड्याला शासनाची मंजुरी मिळाल्याशिवाय या प्रकल्पावर सिडकोला अंमलबजावणी करता येणार नाही. त्यामुळेच हा प्रकल्प रखडल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
>विशेष हेतू वहन कंपनी
नैना योजनेंतर्गत ६0:४0 स्वेच्छेने लॅण्ड पुलिंग संकल्पनेनुसार खालापूर स्मार्ट सिटीचे नियोजन व विकासासाठी रायगड जिल्ह्यातील खालापूर, महाड, शिरवली, निंबोडे, वणवे, नादोडे, निगडोली, कलोटे, मोकाशी, कलोटे रयाती, विणेगाव आणि कंद्रोली या प्रमुख गावांतील सहभागी भूमालकांच्या विशेष हेतू वहन कंपनीची (एसपीव्ही) स्थापना करण्याचे प्रस्तावित आहे. प्रकल्पाच्या विकासासाठी ४0 टक्के जमीन ही या खालापूर विशेष हेतू वहन कंपनीमार्फत दिली जाईल. विकासासाठी उपलब्ध होणाऱ्या एकूण ६0 टक्के जमिनीच्या अंतर्गत भागामध्ये भौतिक व सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास करण्याची जबाबदारी याच कंपनीवर असेल. एकूणच पुण्यातील मगरपट्टी शहराच्या धर्तीवर ही स्मार्ट सिटी उभारण्याची योजना आहे.
>७,९0९ कोटी खर्चाचे अंदाजपत्रक
खालापूर स्मार्ट सिटीत पायाभूत सुविधांवर ३ हजार २८७ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आले होते. सिडकोतर्फे शहरी व इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ४ हजार ६२२ कोटींची गुंतवणूक अपेक्षित धरण्यात आली होती. एकूण ७ हजार ९0९ कोटी रूपयांचा हा प्रकल्प २0१७मध्ये सुरूवात होणे अपेक्षित होते; परंतु सिडकोने आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पावर अधिक लक्ष केंद्रित केल्याने खालापूर स्मार्ट सिटीचा प्रकल्प रखडल्याचे जाणकारांचे मत आहे.
>प्रकल्पाची वैशिष्ट्ये
११ गावे
३५५0 हेक्टर जमीन
२५ टक्के जमीन पायाभूत सुविधांसाठी
१५ टक्के जमीन ग्रोथ सेंटर्ससाठी
६0 टक्के जमीन विकासासाठी
खालापूर स्मार्ट सिटी हा सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत येणारी ११ गावे नैनाच्या दुसऱ्या टप्प्यातील आहेत. दुसऱ्या टप्प्याच्या विकास आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राज्य सरकारच्या मंजुरीसाठी तो लवकरच राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. राज्य सरकारची मंजुरी मिळताच या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात येईल.
- प्राजक्ता लवांगरे-वर्मा,
सहव्यवस्थापकीय संचालिक, सिडको

Web Title: Khalapur smart city paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.