खंबाटकी घाटात वाहतुकीची कोंडी !
By admin | Published: August 13, 2016 12:44 PM2016-08-13T12:44:23+5:302016-08-13T12:44:35+5:30
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात सहा पदरीकरणाचे काम सुरू असल्याने वाहनांची कोंडी होत आहे.
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. १३ - सलग तीन दिवस सुट्यांमुळे पुणे, मुंबईच्या पर्यटकांची पाऊले कास, बामणोली, महाबळेश्वरच्या दिशेने वळायला लागली आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात सहा पदरीकरणाचे काम सुरू असल्याने वाहनांची कोंडी होत आहे. वाहने गरम झाल्याने बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत.
दुसरा शनिवार, रविवार व सोमवारी स्वातंत्र्य दिन या सलग सुट्या साज-या करण्यासाठी पुणे, मुंबईचे हौसी पर्यटक साता-याच्या दिशेने येऊ लागले आहेत. महाबळेश्वरमध्ये प्रचंड धुके अन् मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे वर्षासहल अनुभवण्यासाठी ही नामी संधी आहे. कास पठारावर फुले उमलण्यास अद्याप सुरुवात झाली नसली तरी कास, बामणोलीतही मुसळधार पाऊस असून तेथील डोंगरात ठिकठिकाणी लहानमोठे धबधबे तयार झाले आहेत. तसेच देशातील सर्वात उंच वज्रराई धबधबे हौसी पर्यटकांना खुणावत आहेत.
पर्यटकांच्या वाढत्या संख्येचा परिणाम खंबाटकी घाटात दिसायला लागला आहे. घाटात सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे संधगतीने वाहतूक सुरू आहे. त्यातच चारचाकी गाड्यांचे इंजिन तापल्याने बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.