कोपर्डी खटला : ती घटना आणि खटल्याचा घटनाक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 04:25 AM2017-11-30T04:25:49+5:302017-11-30T04:27:05+5:30
कोपर्डी (ता़ कर्जत जि़ अहमदनगर) येथे १३ जुलै २०१६ रोजी नववीत शिकणारी निर्भया सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भाजीचा मसाला आणण्यासाठी जवळच असलेल्या आजोबांच्या घरी सायकलवरून गेली होती.
कोपर्डी (ता़ कर्जत जि़ अहमदनगर) येथे १३ जुलै २०१६ रोजी नववीत शिकणारी निर्भया सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भाजीचा मसाला आणण्यासाठी जवळच असलेल्या आजोबांच्या घरी सायकलवरून गेली होती़ ती परतत असताना रस्त्यावर दबा धरून बसलेल्या पप्पू उर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे याने तिला अडविले़ निर्भयाला फरपटत रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात नेऊन तिच्यावर त्याने अत्याचार करून तिचा अमानूषपणे खून केला़ त्यानंतर मृतदेह घटनास्थळापासून जवळच असलेल्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली नेऊन टाकला़ याच दरम्यान निर्भयाचा मावस भाऊ तिला शोधण्यासाठी आला तेव्हा लिंबाच्या झाडाखाली त्याला शिंदे दिसला़ शिंदे याने तेथून पळ काढला़ काहीवेळातच घटनास्थळी मुलीचे नातेवाईक दाखल झाले तेव्हा तिचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह पडलेला होता़ तिच्या अंगावर सर्वत्र जखमा होत्या़ तिला तत्काळ कुळधरण येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले़ मात्र तोपर्यंत मृत्यू झालेला होता़ या घटनेबाबत कर्जत पोलिसांना माहिती देण्यात आली़ याप्रकरणी मुलीच्या मावसभावाने कर्जत ठाण्यात फिर्याद दाखल केली़ घटनेच्या दुसºया दिवशी जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले़ दोन दिवसांनंतर जितेंद्र शिंदे याला श्रीगोंदा येथून पोलिसांनी अटक केली़ शिंदे याने केलेल्या कृत्यात (कटात) संतोष भवाळ व शिंदे याचा मावसभाऊ नितीन भैलुमे यांचाही सहभाग असल्याचे समोर आले़ पोलिसांनी १६ जुलै २०१६ रोजी भवाळ तर १७ जुलै रोजी भैलुमे याला अटक केली़ या प्रकरणाचा तपास सुरुवातीला कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी केला़ त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी तपास करून घटनेनंतर ८५ दिवसांनी ७ आॅक्टोबर २०१६ रोजी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले़ हा खटला सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अॅड़ उज्ज्वल निकम यांनी लढविला़
आरोपी क्र. १
जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे
शिंदे हा कोपर्डीतील रहिवासी असून, तो गावातीलच वीटभट्टीवर मजुरी करत होता़ त्याचे आई-वडीलही मोलमजुरी करतात़ घटनेनंतर आई-वडील गाव सोडून गेले आहेत़ पोलिसांना शिंदे याच्या घरात अश्लिल सीडी आढळल्या होत्या़ तो विवाहित आहे.
आरोपी क्र. २
संतोष गोरख भवाळ
भवाळ हा कर्जत तालुक्यातील खांडवी येथील रहिवासी आहे़ तो जितेंद्र सोबत कोपर्डी येथे वीट्टभट्टीवर काम करत होता़ त्याचे आई-वडील मजूर आहेत़ तोही विवाहित आहे.
आरोपी क्र. ३
नितीन गोपीनाथ भैलुमे
भैलुमे हा कोपर्डी येथील राहणारा असून, तो
पुणे येथे बी.एस्सी.च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता़ तो जितेंद्र शिंदे याचा मावसभाऊ आहे़
निकम यांनी केला २४ मुद्यांवर युक्तिवाद
घटनेपूर्वी आरोपींचे पीडित मुलीशी गैरवर्तन
पीडित मुलीचा अनैसर्गिक मृत्यू
पीडित कोपर्डी शिवारात सापडली
आरोपी घटनास्थळी हजर होते
आरोपी शिंदेला साक्षीदाराने पळताना पाहिले
घटनास्थळी शिंदेची चप्पल व माळ मिळाली
घटनेनंतर तीनही आरोपी पसार होते
शिंदेने ११ जुलैला दुचाकी विकत घेतली
घटनेनंतर ती दुचाकी जळीत अवस्थेत मिळाली
शिंदेचे रक्ताने भरलेले कपडे पोलिसांनी जप्त केले
पीडितेच्या अंगावरील दाताचे व्रण आरोपी शिंदे याचेच
२१ जुलैला शिंदे याच्या घरातून अश्लिल सीडी जप्त
छेडछाडीदरम्यान इतर दोन आरोपी शिंदे याच्यासोबत होते़
भैलुमे व भवाळ यांचे वक्तव्य, ‘नंतर हिला कामच दाखवू’
तिघांचा अत्याचार करण्याचा कट होता
भैलुमे व भवाळने शिंदेच्या कृत्यासाठी पहारा दिला
पीडितेच्या मनात दहशत निर्माण केली होती
घटनेच्या वेळी शिंदे याचा भैलुमेस ३० सेकंदाचा फोन
कृत्यानंतर पळ काढण्यास गाडी सज्ज ठेवली होती
तिघांनी मिळून अत्याचाराचा कट रचला होता
चुका माहित असून देखील त्या कशा नाकारल्या
आरोपींनी विसंगत जबाब दिले
कुठलाही रहिवास गुन्हा नाही, पण घटनास्थळी असणे हा गुन्हा
युक्तिवादाचे ध्वनीमुद्रण
या खटल्यात सरकारी व आरोपी पक्षाने केलेल्या अंतिम युक्तिवादाचे ध्वनीमुद्रण करण्यात आले़ न्यायालयातील सुनावणीचे ध्वनीमुद्रण झाले, असा हा आजवरचा पहिलाच खटला. युक्तिवाद काय केला? हे समजण्यासाठी ध्वनीमुद्रण संबंधित खटला चालविणाºया वकिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आले.
कोपर्डी घटनाक्रम
१३ जुलै २०१६ : सायंकाळी
साडेसात वाजेच्या सुमारास कोपर्डी (ता. कर्जत)येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून
१४ जुलै आरोपीच्या अटकेसाठी कोपर्डी येथे ग्रामस्थांचे आंदोलन
१५ जुलै : मुख्य आरोपी पप्पू उर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे याला श्रीगोंदा येथून अटक
१६ जुलै : दुसरा आरोपी संतोष भवाळ याला अटक
१७ जुलै : तिसरा आरोपी नितीन भैलुमे यालाही अटक
१८ जुलै : घटनेतील दोघा आरोपींवर जिल्हा न्यायालय परिसरात हल्ला
२० जुलै : कर्जत येथील मुलींनी रस्त्यावर उतरून केला घटनेचा निषेध
२४ जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोपर्डी येथे भेट
२३ सप्टेंबर : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर शहरात ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चा
७ आॅक्टोबर : तिघा आरोपींविरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
१ एप्रिल २०१७ : कोपर्डी खटल्यातील तिघा आरोपींवर शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हा न्यायालयाच्या आवारात प्राणघातक हल्ला
२३ जून : खटल्यात बचाव पक्षाकडून मुख्यमंत्री व अॅड़ उज्ज्वल निकम यांची साक्ष घेण्याची मागणी
२ जुलै : कोपर्डीत सूर्योदय संस्थेच्यावतीने निर्भयाचे स्मारक बांधण्याचा निर्णय
७ जुलै : अॅड़ उज्ज्वल निकम यांची साक्ष घेण्याची मागणी जिल्हा न्यायालयाने फेटाळली
३ आॅगस्ट : अॅड़ निकम यांच्यासह सहा जणांची साक्ष घेण्याची मागणी खंडपीठाने फेटाळली
१७ आॅगस्ट : अॅड़ निकम यांच्यासह सहा जणांची साक्ष घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
४ सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कोपर्डी घटनेबाबत केलेल्या निवेदनाची व्हिडिओ सीडी आरोपी पक्षाने न्यायालयात दाखवली.
२६ आॅक्टोबर : सरकारी पक्षाकडून अंतिम युक्तिवादाला प्रारंभ
२६ आॅक्टोबर : आरोपी पक्षामुळे कोपर्डीचा खटला लांबल्याचा अॅड़ उज्ज्वल निकम यांचा आरोप
९ आॅक्टोबर : आरोपी पक्षाचा अंतिम युक्तिवाद समाप्त
१८ नोव्हेंबर : खटल्यातील तिघा आरोपींवर खून, अत्याचार व कटकारस्थानाचा दोष सिद्ध
२१ नोव्हेंबर : आरोपी पक्षाच्या वतीने शिक्षेवर युक्तिवाद.
२२ नोव्हेंबर : सरकारी पक्षाच्या वतीने शिक्षेवर युक्तिवाद.
२९ नोव्हेंबर : तिघा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.
घटनेचे राज्यभर सामाजिक पडसाद
ऐतिहासिक मूक मोर्चांचा जन्म
कोपर्डीच्या घटनेनंतर राज्यात सकल मराठा मोर्चा व त्यानंतर विविध जातींच्या मोर्चांचा जन्म झाला. सर्वप्रथम औरंगाबाद येथे ९ आॅगस्ट २०१६ रोजी सकल मराठा समाजाचा मूक मोर्चा निघाला़ त्यानंतर राज्यात मराठा मोर्चांची मालिकाच सुरू झाली. तीन महिन्यांत लाखोंचे ५८ मोर्चे निघाले़ ९ आॅगस्ट २०१७ रोजी मुंबईत राज्यस्तरीय मोर्चा निघाला. कोपर्डीच्या आरोपींना फाशी द्या, या मागणीसह मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्या या मोर्चात करण्यात आल्या.
अॅट्रॉसिटी कायद्याबाबत आक्षेप
या घटनेला जातीय रंगही प्राप्त झाला. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, अशी मागणी सुरुवातीला झाली. दलित संघटनांकडून या मागणीस तीव्र आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर या कायद्यात आवश्यक ते बदल करावेत अशी मागणी मराठा मोर्चादरम्यान झाली़ कालांतराने हा वाद शमला. मराठा मोर्चानंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी राज्यशासनाने राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्षपद भरत या पदावर संभाजीराव म्हसे यांची नियुक्ती केली. मात्र, म्हसे यांचे निधन झाल्याने पद पुन्हा रिक्त झाले.
नेत्यांच्या रांगा
कोपर्डी घटनेनंतर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री राम शिंदे, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह माजी मंत्री, आमदार, खासदार व विविध पक्ष, संघटनांच्या नेत्यांनी कोपर्डी येथे भेट देऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले़ कोपर्डी येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर व जोगेंद्र कवाडे यांच्या भेटीला मात्र विरोध झाला़ त्यामुळे ते कोपर्डीला जाऊ शकले नाहीत़
विधानसभेसह संसदेत पडसाद
कोपर्डी घटनेचे राज्याच्या विधानसभेसह संसदेतही पडसाद उमटले. संसदेत महाराष्ट्रातील खासदारांनी महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला होता़ विधानसभेत तर विरोधक काळ्या फिती लावून सभागृहात आक्रमक झाले होते़ प्रश्न उत्तरांचा तास स्थगित करुन कोपर्डी घटनेवर चर्चेची मागणी झाली़ त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या खटल्यात विशेष सरकारी वकील अॅड़ निकम यांची नियुक्ती केल्याचे सांगत खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असल्याचे निवेदन केले.
तपास सामाजिक दबावातून झाल्याचा आरोप
कोपर्डी घटनेनंतर निर्माण झालेल्या सामाजिक दबावातून पोलिसांनी तपास पूर्ण करत आरोपींविरोधात पुरावे गोळा केले़ सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि साक्षीदार प्रत्यक्ष घटनेशी विसंगत आहेत़, असा दावा युक्तिवादारम्यान तिनही आरोपीच्या वकिलांनी केला