लडाखला जाताय, वैद्यकीय तपासणी कराच!

By Admin | Published: May 23, 2017 03:33 AM2017-05-23T03:33:03+5:302017-05-23T03:33:03+5:30

सुट्टीत फिरण्यासाठी लेह-लडाखला जायचा बेत आखत असाल तर कृपया आधी वैद्यकीय तपासणी करा, असे आवाहन वरळीच्या दाम्पत्याने केले आहे. आपल्या पाच वर्षांच्या चिमुरडीसह

Ladakhala, medical checkup carches! | लडाखला जाताय, वैद्यकीय तपासणी कराच!

लडाखला जाताय, वैद्यकीय तपासणी कराच!

googlenewsNext

स्नेहा मोरे 
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सुट्टीत फिरण्यासाठी लेह-लडाखला जायचा बेत आखत असाल तर कृपया आधी वैद्यकीय तपासणी करा, असे आवाहन वरळीच्या दाम्पत्याने केले आहे. आपल्या पाच वर्षांच्या चिमुरडीसह हे दाम्पत्य लेह-लडाखला फिरण्यासाठी गेले होते. तेथे पुरेशा आॅक्सिजनअभावी त्यांच्या मुलीला नाहक जिवाला मुकावे लागले.
वरळी येथील कमलेश जैन आणि पूनम जैन हे आपल्या कुटुंबातील २७ सदस्यांसह नुकतेच लेह-लडाखला पर्यटनासाठी गेले होते. त्यांच्यासोबत १३ लहान मुले-मुली होती. १३ मे रोजी संध्याकाळी जैन यांची पाच वर्षांची मुलगी वृत्ती हिला अचानक त्रास होऊ लागला. त्यानंतर दोन उलट्या झाल्या. आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे तिला हा त्रास जाणवू लागला होता. तिला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल होण्याआधीच आॅक्सिजनच्या अभावामुळे हृदयविकाराचा झटका येऊन तिचे निधन झाले. आपल्या काळजाचा तुकडा गमाविल्याचे दु:ख मोठे होते. तरीही स्वत:ला सावरत कमलेश जैन यांनी प्रसंगावधान राखून समूहातील इतर लहानग्यांची आॅक्सिजनची पातळी तपासण्याविषयी सतर्कता दाखविली. त्यानुसार १० लहान मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करून आॅक्सिजन पुरविण्यात आला. त्यात वृत्तीची १० वर्षांची बहीणही होती.
या दु:खद घटनेनंतर लेह-लडाखला जाण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करून घ्या, असे आवाहन जैन दाम्पत्याने केले आहे. वृत्तीची आई पूनम जैन यांनी सांगितले की, लेह-लडाखला लहान मुलांना घेऊन जाणे शक्यतो टाळा; किंवा मग जाण्यापूर्वी संपूर्ण वैद्यकीय तपासणी करा. तिथे पोहोचल्यानंतरही पुन्हा तपासणी करा.
लेह-लडाखला पोहोचल्यानंतरचा एक दिवस तेथील वातावरण स्थिरस्थावर होण्यासाठी कुठेच फिरायला जायचे नाही, एवढेच पर्यटन कंपन्यांकडून सांगण्यात येते. मात्र त्यामागचे कारण या कंपन्या गांभीर्याने सांगत नाहीत, ही खंत
आहे. म्हणूनच आम्ही याविषयी पर्यटकांना जागरूक करायचे ठरविले आहे.
यंत्रणेकडून पदरी निराशाच
लेह-लडाख येथील पोलीस प्रशासन, रुग्णालय प्रशासन सर्व माणुसकीने वागल्याचे कमलाकर जैन यांनी सांगितले. मात्र त्यानंतर जेट एअरवेजने कार्गो विमानाची व्यवस्था करण्यात केलेली दिरंगाई, मुंबई विमानतळावरील पोलिसांचे कागदोपत्री सोपस्कार आणि वरळी पोलिसांनी पंचनाम्यासाठी घेतलेला वेळ हे सहनशीलतेचा अंत पाहणारे होते, असे जैन यांनी सांगितले. अशा प्रसंगात कागदोपत्री सोपस्कारांपेक्षा आधी अंत्यसंस्कारांना प्राधान्य दिले पाहिजे किंवा निदान त्या कुटुंबीयांचे दु:ख समजून घेतले पाहिजे, असे जैन म्हणाले.


अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा
दिल्लीतील विमानतळावर सामान तपासणीवेळी जैन यांच्या औषधांच्या बॅगत मोबाइल सापडला. तपासणी अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर तो बॅगेतून काढण्यात आला. बॅग वेळेवर मिळेल असे सांगण्यात आले. मात्र २४ तासांच्या प्रतीक्षेनंतरही बॅग मिळण्यास उशीर झाल्याचे जैन यांनी सांगितले. १२ मे रोजी दिल्ली विमानतळावर हा प्रकार घडला, त्यानंतर १३ मे रोजी सायंकाळी ७.४०च्या दरम्यान वृत्तीचे निधन झाल्यानंतर ८ वाजता औषधांची बॅग देण्यात आली.


थेट विमानप्रवास टाळा : लेह-लडाखला जाताना थेट विमानप्रवास टाळावा, कारण मुंबईसारख्या शहराची समुद्रपातळीपासूनची उंची आणि लेह-लडाखची उंची यात खूप फरक आहे. या वातावरणात सामान्यांना सामावून घेणे खूप कठीण जाते, त्यामुळे याकडे पर्यटकांनी लक्ष द्यावे, असे पूनम जैन यांनी सांगितले.

Web Title: Ladakhala, medical checkup carches!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.