रायगड-रत्नागिरीच्या समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात स्टिंगरे मासे, हवामान बदलांचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 04:29 PM2017-10-03T16:29:23+5:302017-10-03T16:31:54+5:30
रायगड जिल्ह्यातील नवगाव, वरसोली, सासवणे, मांडवा, सारळ तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली समुद्र किनारी मोठय़ा प्रमाणात स्टिंगरे अर्थात पाकट आणि अन्य काही प्रकारचे मासे शनिवारी-रविवारी अचानक येवून थडकल्याने किनारी भागातील कोळी बांधवांमध्ये मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
- जयंत धुळप
अलिबाग - रायगड जिल्ह्यातील नवगाव, वरसोली, सासवणे, मांडवा, सारळ तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली समुद्र किनारी मोठय़ा प्रमाणात स्टिंगरे अर्थात पाकट आणि अन्य काही प्रकारचे मासे शनिवारी-रविवारी अचानक येवून थडकल्याने किनारी भागातील कोळी बांधवांमध्ये मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अलिबाग तालुक्यांतील नवगाव, वरसोली, सासवणे, मांडवा, सारळ या समुद्र किना:यांवर हे मासे आढळून आल्याच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी मुंबईतील सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटच्या सागरी तज्ज्ञांच्या पथकाने नवगाव येथील समुद्र किना-यांची पाहणी केली. समुद्र तळाला होणारे भौतिक बदल त्याच बरोबर हवामानातील बदल यामुळे हे मासे किना-याकडे आले आहेत. मान्सून समाप्तीच्या वेळी अशा प्रकारे हवामानातील बदल खोल समुद्रात होवू शकता. सागरी प्रदूषणामूळे हे घडलेले नसल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. माशांचे नमुने घेण्यात आले असून, प्रय़ोगशाळेतील तपासणी अंती अंतिम निष्कर्ष सांगता येईल अशी माहिती सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटचे संचालक तथा सागरी तज्ज्ञ डॉ.वीरेंद्र सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील या किना-यांवर शनिवारी व रविवारी काही ठिकाणी हे मासे दिसून आल्यावर, त्या बाबतची खातरजमा करण्याकरिता सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटला कळविण्यात आले होते. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटचे संचालक तथा सागरी तज्ज्ञ डॉ.विरेंद्र सिंग व डॉ.रामकुमार आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अलिबाग क्षेत्रीय अधिकारी एम.बी.वाघमारे यांनी नवगांव येथे सत्वर भेट देवून हि पहाणी केली. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ुटचा अधिकृत अहवाल येत्या काही दिवसात प्राप्त होईल, अशी माहिती मत्स्य विभागाचे उपायुक्त अविनाश नाखवा यांनी दिली.
२० ते २५ किलोचा एक स्टींगरे ५०० ते ७०० रूपयांर्पयत विकला जात होता. तर कोळंबी ४० ते ५० रूपये किलो प्रमाणो विकली जात होती. त्यामुळे स्थानिक कोळी बांधव विक्रीमूळे तर खवय्ये मासे खाण्यास मिळाल्याने सुखावले होते.