समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा शुभारंभ
By admin | Published: November 3, 2016 08:24 PM2016-11-03T20:24:06+5:302016-11-03T20:32:36+5:30
राज्यात रोहयोच्या समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा शुभारंभ गुरुवारी रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला. शिंदखेडा तालुक्यात ही योजना पथदर्शी
ऑनलाइन लोकमत
शिंदखेडा, दि. 03 - राज्यात रोहयोच्या समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा शुभारंभ गुरुवारी रोहयो मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला. शिंदखेडा तालुक्यात ही योजना पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत दोन वर्षात १० हजार कोटी खर्चाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
शिंदखेडा येथे बिजासनी मंगल कार्यालयात योजनेच्या शुभारंभ प्रसंगी तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच, ग्रामसेवक आणि संपूर्ण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची कार्यशाळाही घेण्यात आली. कार्यशाळेस जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए.बोटे, अनिल सोनवणे, नरेगाचे उपायुक्त उदय पाटील, विशेष कार्यकारी अधिकारी अरविंद अंतुर्लीकर, पंचायत समिती सभापती सुनंदा गिरासे, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जि.प.सदस्य कामराज निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिवदे, तहसीलदार गायत्री सौंदाणे उपस्थित होते.
राज्याच्या विधीमंडळ रोजगार हमी समितीने मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्याचे दौरे करुन त्याठिकाणी या योजनेची अंमलबजावणी कशी होते. त्याचा अभ्यास करुन नवीन कर्न्हजन्स योजना आम्ही तयार केली. ही योजना पूर्वीच्या योजनेपेक्षा लवचिक आहे. या योजनेमुये केंद्र सरकारकडून पाहिजे तेवढा पैसा राज्यातील जनतेला आणि ग्रामीण भागाला समृद्ध करण्यासाठी वापरता येणार आहे. नवीन ११ कलमी कार्यक्रमात वैयक्ति आणि सार्वजनिक लाभाची कामे घेता येणार आहेत. दोन वर्षात १ लाख ११ हजार १११ कामांचा लक्षांक ठेवण्यात आला आहे. लक्षांकाच्या पुढे जाऊन देखील निधी देण्याची तयारी आमच्या विभागाची आहे.
योजनेचा अंमलबजावणीचे वेळापत्रक- ७ नोव्हेंबर रोजी लाभार्थी निवडीसाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेण्यात येईल. ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही करण्यात येईल, ग्रामपंचायतीकडे प्राप्त अर्ज तांत्रिक मान्यता देण्यासाठी पाठविणे, १५ ते २५ नोव्हेंबर दरम्यान तांत्रिक मान्यतेची कार्यवाही करण्यात येईल, २८ नोव्हेंबरला प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करणे, २९ ते ३० नोव्हेंबर दरम्यान छाननी समितीसमोर सादर करणे व मान्यता देणे, १ ते ३ डिसेंबर लाभार्थ्यांच्या यादीस जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांची मान्यता घेण्यात येईल. ५ ते ६ डिसेंबर पर्यंत प्रशासकीय मान्यता देणे, ७ ते १३ डिसेंबरपर्यंत कामांना सुरुवात करणे आणि ५ मार्चपर्यंत ११ कलम कार्यक्रमाची सर्व कामे पूर्ण करुन पूर्णत्वाचे प्रमाणपत्र आॅनलाईन उपलब्ध करुन देणे, असे योजनेच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक आहे.
- समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर, अमृतकुंड शेततळे, भूसंजीवन व्हर्मी कंपोस्टींग, भू - संजीवन नाडेप कंपोस्टींग, कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल शौचालय, निर्मल शोषखड्डे, समृद्ध गाव व इतर समृद्ध जलसंधारण कामे, अंकुर रोपवाटिका, नंदनवन वृक्ष लागवड आणि संरक्षण ग्रामपंचायत सबलीकरण व समृद्ध ग्राम योजना अशी कामे घेण्यात येणार आहे.