विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 04:28 AM2018-02-24T04:28:12+5:302018-02-24T04:28:12+5:30
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून अलीकडे एकमेकांच्या अधिक जवळ आलेले
मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून अलीकडे एकमेकांच्या अधिक जवळ आलेले विरोधक आणि त्याचवेळी दुरावलेले सत्तारूढ पक्ष असा सामना बघायला मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही मंत्र्यांना लक्ष्य करण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे.
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे उत्साहित असलेले मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमला तब्बल २२ दिवसांच्या कामकाजात विरोधकांच्या ‘हल्लाबोल’ंला सामोरे जावे लागणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे ९ मार्च रोजी २०१८-१९ चा राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करतील.
धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांची मंत्रालयातील आत्महत्या, कर्जमाफी देण्यात झालेला विलंब, त्यात मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने घातलेला घोळ, बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदतीत विलंब, कीटकनाशकांच्या फवारणीमुळे झालेले शेतकºयांचे मृत्यू आणि सरकारने देऊ केलेली तोकडी मदत हे मुद्दे विरोधकांच्या भात्यात असतील. धर्मा पाटील प्रकरणावरून पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे विरोधकांच्या रडारवर असतील. त्यांच्याविरुद्ध आणखी काही आरोप केले जाणार आहेत.
राज्यावरील ४ लाख कोटी रुपयांचे कर्ज, आर्थिक वर्ष संपण्यास एक महिना उरलेला असताना गेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतील ५० टक्केही निधी खर्च न होणे, राज्य सरकारी कर्मचाºयांचा सातवा वेतन आयोग हे मुद्दे विरोधकांच्या मदतीला असतील. कोरेगाव भीमातील घटना, संभाजी भिडे-एकबोटेंबाबत सरकारची भूमिका, राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती यावरून विरोधक मुख्यमंत्र्यांना घेरतील.
शालार्थ ही प्रणाली कोलमडल्याने शिक्षक, कर्मचाºयांचे थकलेले वेतन यासह विविध मुद्द्यांवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर विरोधक निशाणा साधतील तर शिष्यवृत्ती वाटपात झालेल्या अभूतपूर्व घोळासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि ओबीसी विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांना विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागेल.
सत्तारूढ भाजपा-शिवसेनेतील संबंध सध्या ताणले गेले आहेत. शिवसेनेने पुढील निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. बाहेर शिवसेना मोदी-अमित शहांपासून सर्वांवर सडकून टीका करीत असली तरी राज्य सरकार चालविताना मुख्यमंत्री फडणवीस बरोबर जुळवून घेतात, असा अनुभव आहे. त्याची पुनरावृत्ती या अधिवेशनात होईल का याबाबत उत्सुकता असेल.
मुख्यमंत्र्यांचे चहापान उद्या
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना रविवारी सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहावर चहापानासाठी निमंत्रित केले आहे. तत्पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांची संयुक्त बैठक दुपारी होणार असून तीत चहापानावरील बहिष्काराबाबत निर्णय घेण्यात येईल.
विधानसभा आणि विधान परिषदेत एकाच प्रकारचे आरोप करून पुनरावृत्ती करण्याऐवजी वेगवेगळे आरोप करून सरकारची कोंडी करण्याची विरोधकांची खेळी असेल.
प्रत्येक आठवड्यात एक प्रस्ताव चर्चेसाठी आणत आरोपांची राळ उडवायची आणि सरकारला लक्ष्य करायचे अशीही विरोधकांची योजना आहे.
किमान तीन मंत्र्यांविरुद्ध घोटाळ्यांचे नवीन आरोप करण्यासाठीची ‘सामग्री’ विरोधकांनी तयार ठेवली आहे.