भाजपाकडून शिवसेनेला 25-23चा प्रस्ताव; भिवंडी किंवा पालघर सोडण्यास तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 13:05 IST2019-02-04T13:03:11+5:302019-02-04T13:05:06+5:30
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं 26, तर शिवसेनेनं 22 जागा लढवल्या होत्या.

भाजपाकडून शिवसेनेला 25-23चा प्रस्ताव; भिवंडी किंवा पालघर सोडण्यास तयार
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपामध्ये युतीची चर्चा सुरू आहे. भाजपानं शिवसेनेसाठी अधिकची जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं 26, तर शिवसेनेनं 22 जागा लढवल्या होत्या. मात्र आता भाजपानं आपल्या कोट्यातील एक जागा शिवसेनेला सोडण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपामधील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मात्र यावर अद्याप शिवसेनेनं प्रतिक्रिया दिलेली नाही.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं 25-23 चा फॉर्म्युला तयार केला आहे. भिवंडी किंवा पालघरची जागा शिवसेनेला सोडण्याबद्दल चर्चा सुरू आहे. सध्या या दोन्ही जागांवर भाजपाचे खासदार आहेत. चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पालघरमध्ये गेल्या वर्षी पोटनिवडणूक झाली. त्यात त्यांचे पुत्र श्रीनिवास वनगा पराभूत झाले. मात्र त्यांनी भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना चांगली टक्कर देत जवळपास अडीच लाख मतं मिळवली. त्यामुळे ही जागा शिवसेनेसाठी सोडली जाऊ शकते.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेत 26-22 असा फॉर्म्युला होता. त्यावेळी भाजपानं स्वत:च्या कोट्यातील दोन जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी हातकणंगलेमधून निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयी झाले होते. तर महादेव जानकर बारामतीमधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. ते राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंकडून पराभूत झाले. मात्र त्यांनी सुळे यांनी कडवी लढत दिली होती. दोन जागा मित्रपक्षांसाठी सोडणाऱ्या भाजपानं 2014 मध्ये 24 जागा लढवल्या. त्यातील 23 जागा त्यांनी जिंकल्या. तर शिवसेनेनं 22 जागा लढवत 18 जागांवर यश मिळवलं.