...तर घरी बसलो असतो, पण मतं मागितले नसते : धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 12:31 PM2019-04-25T12:31:30+5:302019-04-25T12:31:30+5:30
उज्वला, स्कील इंडिया, जीएसटी, मेक इन इंडिया, मुद्रा लोन या योजनांच काय झालं याविषयी तुम्ही बोलणे अपेक्षीत होते. परंतु, शहीद जवानांच्या बलिदानावर मत मागण्याची अत्यंत वाईट वेळ तुमच्यावर आल्याचे मुंडे म्हणाले.
पुणे - दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात अनेक कारगील युद्ध झाले. परंतु, त्यांनी कधी जवानांच्या शौर्यावर किंवा त्यांच्या बलिदानावर मतं मागितले नाही. मात्र मोदीजी तुम्ही पुलवामामधील शहीद जवांनांच्या बलिदानावर खुशाल राजकारण करत आहेत. त्यापेक्षा घरी बसा अशी टीका विरोधपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.
तुम्ही देशाचे चौकीदार असल्याचे म्हणता. पण लोक आता तुम्हाला 'चौकीदार चोर' म्हणत आहेत. उज्वला, स्कील इंडिया, जीएसटी, मेक इन इंडिया, मुद्रा लोन या योजनांच काय झालं याविषयी तुम्ही बोलणे अपेक्षीत होते. परंतु, शहीद जवानांच्या बलिदानावर मत मागण्याची अत्यंत वाईट वेळ तुमच्यावर आल्याचे मुंडे म्हणाले.
इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करूनही जनतेत सैनिकांच्या शौर्यावर मत मागितले नाही. अटलजींनी देखील कधी जनतेत जावून शहीद जवानांच्या नावे मते देण्याचे आवाहन जनतेला केले नाही. मोदीजी मी तुमच्या जागी असतो, तर घरी बसलो असतो, परंतु, शहीदांच्या नावे मतं मागितले नसते, असा टोलाही मुंडे यांनी यावेळी लगावला.
यावेळी मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने अमित शाह यांना अफजल खान संबोधले होते. तसेच मराठी माणसाला अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्याचे आवाहन केले होते. मात्र तुम्ही गुजरातमध्ये जावून अफजल खानाला मुजरा करून आल्याची टीका यावेळी मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
मोदींनी, जशोदाबेनच काय झालं, ते सांगवे
वर्ध्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर वैयक्तीक टीका केली. पवार साहेबांच्या कुटुंबापर्यंत मोदी आले. त्यांच्या घरात कलह सुरू असल्याचे म्हटले. अशा वेळेस राष्ट्रवादीचा कार्यकर्ता तुमच्या घरापर्यंत आल्यास काही वावगं वाटायला नको, असं मुंडे यांनी सांगितले. तसेच पवार साहेबांच सोडून द्या मोदी साहेब जशोदाबेनचं काय झालं होत, तेवढं सांगा, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला.