महाराष्ट्रात राज ठाकरेंपाठोपाठ 'या' नेत्याच्या प्रचारसभांची मागणी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 03:12 PM2019-04-12T15:12:13+5:302019-04-12T15:13:41+5:30
काँग्रेसकडून राज्यभरात विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या १० सभांची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांची मागणी राज्यभरातील राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील स्टार प्रचाराकांमध्ये राज ठाकरे आघाडीवर असून त्यांच्या पाठोपाठ धनंजय मुंडे यांच्या सभांची मागणी वाढली आहे. काँग्रेसकडून राज्यभरात विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या १० सभांची मागणी करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे स्टार प्रचारकांची वणवण आहे. अशोक चव्हाण सोडल्यास काँग्रेसकडे राज ठाकरे आणि धनंजय मुंडे यांच्या तोडीचे वक्ते सध्या तरी नाहीत. त्यामुळे काँग्रेसकडून मुंडे आणि ठाकरे यांच्या सभांची मागणी सुरू आहे. महाआघाडीत राज ठाकरे यांना घेण्यासाठी विरोध करणाऱ्या काँग्रेसचे नेतेच राज ठाकरेंच्या सभांची मागणी करत आहेत. राज ठाकरे यांनी आपली भूमिका आधीच स्पष्ट केली असून आपण भाजपला पाडण्यासाठी सभा घेणार असल्याचे स्पष्ट केले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेणार आहेत.
आता धनंजय मुंडे देखील राज्यात सभा घेण्यासाठी सक्रीय होणार आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासाठी मुंडे यांनी बीड जिल्हा पिंजून काढला आहे. आता काँग्रेसकडून दहा जागांवर धनंजय मुंडे यांच्या सभांची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. यापैकी यवतमाळ-वाशीम, हिंगोली, वर्धा आणि नांदेडमध्ये मुंडे यांनी आधीच सभा घेतल्या आहेत.