Lok Sabha Election 2019 : राज ठाकरेंनी उपस्थित केलेले प्रश्न मोदींनी टाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 02:03 PM2019-04-09T14:03:43+5:302019-04-09T14:05:28+5:30
गुडीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली होती. मोदी सरकार जनतेला कशा पद्धतीने फसवते, याचे पुरावे देखील दिले होते.
मुंबई - नोटबंदीच्या वेळी झालेला घोटाळा आणि त्याआधी भाजपकडून अनेक शहरात खरेदी केलेल्या जमिनी, मुद्रा योजनेतील पैशांचा घोटाळा, काश्मीरमध्ये सैन्यावर कारवाई करण्यासाठी दिलेले आदेश आणि डिजीटल इंडियाचे दाखवलेले स्वप्न याचं काय झालं, असे अनेक प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडवा मेळाव्यात पुराव्यासह उपस्थित केले होते. या प्रश्नांना महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील अशी सर्वांनाच आशा होती. परंतु, राज यांच्या प्रश्नांना पंतप्रधान मोदी यांनी बगल दिली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा येथे मोदींची आज सभा झाली.
गेल्या आठवड्यात झालेल्या गुडीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली होती. मोदी सरकार जनतेला कशा पद्धतीने फसवते, याचे पुरावे देखील दिले होते. त्यानंतर मोदी महाराष्ट्रात आल्यानंतर राज ठाकरे यांच्या प्रश्नांना काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र मोदी यांनी राज यांचे दावे आणि उपस्थित केले प्रश्न टाळल्याचे चित्र आहे.
लातूर येथील सभेत मोदी यांनी काँग्रेसवर कडाडून टीका करताना भाजपच्या जाहिरनाम्याविषयी माहिती दिली. यावेळी मोदींनी पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष्य केले. तसेच भाजपचा राष्ट्रवाद येथील जनतेला पटवून दिला. मात्र मोदींनी राज यांच्या प्रश्नांना बगल दिली.
दरम्यान राज ठाकरे येणाऱ्या काळात राज्यभरात आणखी ८-९ सभा घेणार आहेत. राज यांनी भाजपविरोधी भूमिका घेतली असून ते महाआघाडीच्या नेत्यांसाठी सभा घेणार आहेत. त्यांची पुढील सभा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये होणार आहे. याच नांदेडमध्ये मोदींची सभा झाली होती. त्यामुळे नांदेडमध्ये राज काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.