२००९ चा करिष्मा पुन्हा करण्यासाठी राज ठाकरेंची माघार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 03:42 PM2019-03-18T15:42:58+5:302019-03-18T15:45:01+5:30
लोकसभा निवडणूक लढविण्याचा पर्याय खुला असणाऱ्या राज ठाकरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यामध्ये राज यांची नक्कीच मोठी योजना असणार आहे. त्यातही मनसे कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असणार आहे.
मुंबई - राजकीय पटलावर धुमधडाक्यात एंट्री करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात पडझड झाली. पहिल्याच प्रयत्नात १३ आमदारांसह महाराष्ट्रभर दरारा निर्माण करणाऱ्या मनसेकडे आज एकही आमदार शिल्लक नाही. गेल्या काही वर्षांतील अनेक घडामोडींचा मनसेला फटका बसला आहे. परंतु आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सावध भूमिका घेत लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लगेच विधानसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाची ताकत व्यर्थ न घालवता विधानसभा निवडणुकीत २००९ प्रमाणे करिष्मा करण्याची तयारी राज ठाकरे यांनी केल्याची भावना सध्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये आहे.
राज ठाकरे यांनी २००९ मध्ये मनसेची स्थापना केली होती. पहिल्याच प्रयत्नात राज यांनी १३ आमदार निवडून आणले होते. ही कामगिरी मनसेचा आत्मविश्वास वाढविणारी होती. त्यापाठोपाठ नाशिक महानगर पालिका एकहाती मिळविण्याची किमया मनसेने केले होती. परंतु त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उतरती कळा लागली. त्यातून आतापर्यंत पक्ष सावरलेला नाही.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत राज ठाकरे यांनी शिवसेनेविरुद्ध उमेदवार दिले होते. यामध्ये मनसेचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी मनसेची अनामत रक्कम जप्त झाली होती. या नामुष्कीनंतर विधानसभा निवडणुकीत देखील मनसेची धुळधान झाली. १०० हून अनेक जागा लढविणाऱ्या मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला होता. तो देखील आज शिवसेनेते गेला आहे. अशा परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढविण्याचा पर्याय खुला असणाऱ्या राज ठाकरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यामध्ये राज यांची नक्कीच मोठी योजना असणार आहे. त्यातही मनसे कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असणार आहे.
लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मनसेची ताकत कमी पडणार हे निश्चितच आहे. तसेच निवडणुकीसाठी मोठा खर्च होणार आहे. हा खर्च केल्यानंतर काही महिन्यातच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकाच्या तयारीसाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.