'बुरखा बंदी'च्या मागणीवरून संजय राऊत एक पाऊल मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 10:23 AM2019-05-05T10:23:40+5:302019-05-05T10:36:24+5:30
बुरखा बंदीची मागणी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांनी केली नाही. श्रीलंकेतील घडामोडींवर एक विश्लेषण ‘सामना’ने छापले इतकाच हा विषय असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. बुरखा बंदीवरून राजकीय वातावरण तापत असल्याचे लक्षात येताच संजय राऊत यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे बोलले जात आहे.
मुंबई - श्रीलंकेत बॉम्बस्फोटानंतर राष्ट्रीय सुरक्षेसाठी मुस्लिम महिलांना बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' मधून भारतात सुद्धा बुरखा बंदी केली पाहिजे अशी भूमिका मांडण्यात आली होती. बुरखा बंदीच्या मागणीवरून राजकरण तापत असल्याचे दिसताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घुमजाव केलंय. बुरखा बंदीची मागणी शिवसेनेची नाही असा खुलासा राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून केलाय.
श्रीलंकेत मुस्लिम महिलांना बुरख्यावर बंदीची जितकी चर्चा श्रीलंकेत झाली नाही, त्यापेक्षा जास्त चर्चा भारतात पहायला मिळत आहे. सामनामधून बुरखा बंदीची मागणी होताच त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात पहायला मिळाले. विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच बुरखा बंदीची मागणी महाग पडू शकते, लक्षात येताच संजय राऊत यांनी कोलांटी उडी घेतली आहे.
बुरखा बंदीची मागणी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांनी केली नाही. श्रीलंकेतील घडामोडींवर एक विश्लेषण ‘सामना’ने छापले इतकाच हा विषय असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. बुरखा बंदीवरून राजकीय वातावरण तापत असल्याचे लक्षात येताच संजय राऊत यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे बोलले जात आहे.
बुरखा बंदी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनीही स्पष्टपणे जाहीर केले होते. तर, सामनाच्या अग्रलेखातली बुरखा बंदीची मागणी संजय राऊतांचं वैयक्तिक मत असल्याचं निलम गोऱ्हेनी सांगितले होते. त्यामुळे, सामनामध्ये बुरखा बंदी संदर्भात लिहिण्यात आलेल्या अग्रलेखावरून शिवसेनेच्यानेत्यांमध्येच फूट पडल्याची दिसून आले होते.