रणसंग्राम २०१९ : लक्ष्यस्थानी होतं भाजप अन् 'टार्गेट' झाली शिवसेना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 04:10 PM2019-04-25T16:10:58+5:302019-04-25T16:10:58+5:30
भय पक्षांतील वाद विकोपाला गेल्यानंतर देखील युती झाल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. तर अनेकांच्या मते अंतर्गत सर्व्हेमुळेच युती निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. चर्चा काहीही असली तरी भाजप आणि शिवसेना एकोप्याने लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले.
मुंबई - महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचे मतदान झाले असून २९ एप्रिल रोजी राज्यातील मतदानाचा अखेरचा टप्पा समाप्त होणार आहे. मतदान झालेल्या ३१ जागांचे रिपोर्ट येण्यास सुरुवात झाली असून ही लोकसभा निवडणूक शिवसेनेला २०१४ च्या तुलनेत खडतर ठरणार असल्याचे समजते.
काही महिन्यांपूर्वी भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत युती नाहीच, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. अनेकदा सत्तेला लाथ मारण्याची भाषाही केली होती. परंतु, केंद्रीय नेतृत्वासोबतच्या बैठकीनंतर शिवसेना-भाजपचा मिलाप झाला. उभय पक्षांतील वाद विकोपाला गेल्यानंतर देखील युती झाल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. तर अनेकांच्या मते अंतर्गत सर्व्हेमुळेच युती निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. चर्चा काहीही असली तरी भाजप आणि शिवसेना एकोप्याने लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले.
लोकसभा प्रचारात देखील आघाडी आणि भाजप यांच्यातच खरी लढत पाहायला मिळाली. यामध्ये शिवसेना फारशी रणांगणावर दिसून आली नाही. आघाडीकडून सर्वाधिक लक्ष्य भाजपला करण्यात आले. तर आघाडीच्या नेत्यांकडून सर्वाधिक टीका भाजपवर करण्यात आली. भाजपने या निवडणुकीत राष्ट्रवादाचा मुद्दा चांगलाच रेटला. मात्र शिवसेनेचे प्रचारातील मुद्दे अखेरपर्यंत समोर आलेच नाही. अखेरच्या टप्प्यात शिवसेनेकडून वि.दा. सावरकर यांच्याविषयी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला. हा मुद्दा वगळल्यास लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा स्टॅन्ड फारसा लक्षवेधी ठरला नाही, हे वास्तव आहे.
२०१४ मधील विधानसभा निवडणुकीवेळी भाजप-शिवसेना युती फिसकटली होती. त्यावेळी शिवसेना आणि भाजप यांच्याकडून एकमेकांवर झालेली टीका संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली होती. तर प्रमुख विरोधक असलेली आघाडी कुठेही दिसत नव्हती. सगळीकडे शिवसेना आणि भाजपचीच चर्चा होती. शिवसेना आणि भाजपला याची मदतच झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या लक्ष्यस्थानी जरी भाजप असले तरी टार्गेट शिवसेनाच झाल्याचे चित्र आहे. राज ठाकरे यांनी देखील शिवसेनेवरील टीका टाळली असून लोकसभा निवडणुकीत उल्लेख न झाल्याने शिवसेनेच्या समस्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.