चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 10:10 AM2024-05-09T10:10:29+5:302024-05-09T10:13:55+5:30
Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघाची यावेळी जोरदार चर्चा झाली. या मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत आहे.
Ajit Pawar ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघाची यावेळी जोरदार चर्चा झाली. या मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत आहे. प्रचारादरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार शरद पवार यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत भाष्य केलं.
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
"चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांचा पराभव करण्याचे केलेले वक्तव्य चूक होते. त्या विधानाला काही अर्थ नव्हता, त्यामध्ये काही तथ्य नव्हते. चंद्रकांत पाटील यांचे ते विधान चूक होते, हे मी कबूल करतो, असंही अजित पवार म्हणाले. शरद पवार बारामतीमध्ये निवडणुकीमध्ये उभे नव्हते तर साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्नच येत नाही, पवार साहेब निवडणुकीला उभे असते तर वेगळी गोष्ट होती. त्यांनी ते बोलायला नको होतं, ते का बोलून गेले आम्हालाही माहिती नाही, असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, मी चंद्रकांतदादांना म्हणालो तुम्ही पुण्यातच काम बघा. मी आणि आमचे कार्यकर्ते बारामतीच काम बघतो. त्यांनी यानंतर अवाक्षर देखील काढलं नाही. या निवडणुकीत पवार साहेब उभेच नव्हते त्यामुळे त्यांचा पराभव करण्याचा प्रश्नच येत नाही. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार निवडणुकीत उभ्या होत्या त्यामुळे त्यांच्या दोघींतील एकीचा होईल, असंही पवार म्हणाले.
संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी शरद पवार अनेकदा विधाने करतात
पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, मी फार जवळून शरद पवारांसोबत काम केले आहे. त्यांच्या कामाची पद्धत मला माहिती आहे. संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी शरद पवार अनेकदा विधाने करतात. उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील वाटत नाही. मी त्यांचे काम पाहिले आहे. त्यांचा स्वभाव पाहिला आहे ते बघता ते पक्ष विलीन करण्याचा निर्णय घेतील असं वाटत नाही. शरद पवारांना ज्यावेळी निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात, तो सामुहिक निर्णय आहे असं दाखवतात असं त्यांनी सांगितले.