त्यानं निवडणूक अधिकाऱ्याला चॅलेंज केलं अन् बोगस मतदान उघड झालं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 04:03 PM2019-04-18T16:03:47+5:302019-04-18T16:04:17+5:30
बोगस मतदानाच्या चौकशीचे आदेश
सोलापूर : शहरातील डफरीन चौकातील डॉ. आंबेडकर हायस्कूलमध्ये बूथ क्रमांक १७६ वर करण्यात आलेलं मतदान बोगस असल्याची तक्रार चांगदेव बाबू नाईकनवरे या मतदारानं केली. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप ठेवत चॅलेंजिंग मतदान केलं आणि बोगस मतदान उघड झालं.
चांगदेव नाईक नवरे साडेअकरा वाजता मतदान केंद्रावर आले. त्यांनी आपलं मतदार कार्ड निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवलं. निवडणूक अधिकाऱ्यांनी तुमच्या नावाचं मतदान झालं आहे असं सांगितलं. यानंतर नाईकनवरे यांनी मी मतदान केलं नाही. माझं मतदार कार्ड बघा, हाताला शाई आहे का बघा, असं निवडणूक अधिकाऱ्याला सांगितलं. यावेळी अधिकाऱ्यांनी बोगस मतदान झाल्याच्या तक्रारीची दखल घेत चांगदेव नाईकनवरे यांना चॅलेंजिंग मतदान करण्याची परवानगी दिली. चांगदेव नाईकनवरे यांच्या नावावर मतदान केलेल्या मतदाराचा आधार क्रमांक निवडणूक आयोगाने घेऊन ठेवला होता. या प्रकाराचा तपास घेतला जाईल असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले.