...तर भाजपने नथुराम गोडसेला ही तिकीट दिले असतं : काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 03:16 PM2019-04-21T15:16:15+5:302019-04-21T15:16:15+5:30
भाजप बेशरमपणे अशा व्यक्तीचे समर्थन करत आहे, जी व्यक्ती दहशतवाद आणि राष्ट्रविरोधी कारवायात सामील आहे. जवानांच्या बलिदानावर मतदान मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रज्ञा सिंहच्या वक्तव्यावर, जनतेची माफी मागावी वाटली नाही, अस सावंत यांनी नमूद केले.
मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली. त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात संतापाची लाट आली होती. आता काँग्रेसने देखील भाजपवर प्रज्ञा सिंह यांना दिलेल्या उमेदवारीवरून कडाडून टीका केली आहे. महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे जिवंत असते, तर त्यांना देखील भाजपने तिकीट दिले असते, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
जामिनावर सुटलेल्या प्रज्ञा सिंह यांनी २६/११ हल्ल्यात शहिद झालेल्या हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. मी दिलेल्या श्रापामुळेच त्यांचा सर्वनाश झाल्याचा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला होता. आपल्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार केल्यामुळेच आपण करकरेंना श्राप दिला होता, असंही त्यांनी म्हटले होते. विषेश म्हणजे, भाजपकडून तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. त्यानंतर भाजपकडून प्रज्ञा सिंह यांचे समर्थन देखील करण्यात आले. यामुळे प्रज्ञा सिंह यांचे वक्तव्य भाजपच्या हिंदू कार्ड चालवण्यामागची योजना तर नव्हती ना, अशी शंकाही उपस्थित होत आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले की, भाजप बेशरमपणे अशा व्यक्तीचे समर्थन करत आहे, जी व्यक्ती दहशतवाद आणि राष्ट्रविरोधी कारवायात सामील आहे. जवानांच्या बलिदानावर मतदान मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रज्ञा सिंहच्या वक्तव्यावर, जनतेची माफी मागावी वाटली नाही, असंही सावंत यांनी नमूद केले. तसेच एवढा विरोध झाल्यानंतरही प्रज्ञा सिंह यांची उमेदवारी कायम राखल्यामुळे भाजपकडून दहशतवादाचे समर्थन करण्यात येत असल्याचे स्पष्ट होते, असा टोलाही सावंत यांनी लागवला आहे.