"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 10:18 AM2024-05-11T10:18:30+5:302024-05-11T10:18:43+5:30

भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी हैदराबाद केलेल्या एका विधानामुळे नवा वाद उफाळून आलाय.

Loksabha Election No matter how many cases are filed I will not be afraid says Navneet Rana | "आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा

"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा

Navneet Rana : भाजपच्या अमरावतीमधील उमेदवार नवनीत राणा यांनी हैदराबाद येथे बोलताना वादग्रस्त विधान केलं आहे. हैदराबादमध्ये लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारासाठी गेलेल्या नवनीत राणा यांनी अकबरुद्दीन ओवैसी यांच्या एका विधानावरून ओवैसी बंधूंवर जोरदार टीका केली. या टीकेनंतर असदुद्दीन ओवैसी यांनी नवनीत राणांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर  काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं आहे, असं विधान केल्याने नवनीत राणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. यावर बोलताना नवनीत राणा यांनी मी काही गुन्हा दाखल होण्याला घाबरणारी नाही, असं म्हटलं आहे. यासोबत असदुद्दीन ओवैसी यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा असेही राणा म्हणाल्या.

अमरावतीमध्ये निवडणूक पार पडल्यानंतर नवनीत राणा प्रचारासाठी बाहेर पडल्या आहेत. गुरुवारी नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी प्रचार केला. यावेळी त्यांनी अकबरुद्दीन ओवैसी यांच्या विधानाचा हवाला देत ओवैसी बंधूंवर टीकास्त्र सोडलं. “छोट्या भावाने १५ मिनिटांसाठी पोलीस बाजूला करण्यास सांगितले होते. मी आज त्यांना सांगू इच्छिते, छोट्या तुला १५ मिनिटे लागत होती. पण आम्हाला फक्त १५ सेकंद लागणार आहेत. जर १५ सेकंदासाठी पोलिसांना बाजूला केले, तर छोट्या भावाला समजणारही नाही, कुठून आले आणि कुठे गेले.” अशी टीका नवनीत राणा यांनी केली होती. 

त्यानंतर जहिराबादमध्ये भाजपा उमेदवार बी. बी पाटील यांच्या प्रचारादरम्यान नवनीत राणा यांनी आणखी एक विधान केलं. मला इथल्या मतदारांना एक गोष्ट सांगायची आहे. काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं आहे. या गोष्टीला विरोध करण्यासाठीच मी इथे आले आहे, असं राणा यांनी म्हटलं. त्यानंतर  निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून तेलंगणामध्ये राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एबीपी माझासोबत बोलताना नवनीत राणा यांनी ओवैसी यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवं असं म्हटलं आहे.

आमच्या संस्कृतीनुसार आम्ही काम करतो - नवनीत राणा

"अशा गुन्ह्यांना नवनीत राणा मोजत नाही.  ज्या देशामध्ये सव्वाशे कोटींपेक्षा जास्त आमची लोकसंख्या आहे तिथे १५ कोटी असलेले लोक खुलेआमपणे धमकी देतात १५ मिनिटे पोलिसांना बाजूला करा. आम्ही १५ मिनिटांत पाहून घेऊ कोणामध्ये दम आहे. उघडपणे धमकी देणाऱ्या लोकांना उत्तर तर द्यावेच लागेल. ते उत्तर मी दिलं आणि त्यांनी १५ मिनिटे मागितली होती मी १५ सेकंद मागितले आहेत. सव्वाशे कोटी लोकसंख्या असताना घाबरायला आम्ही बांगड्या थोडी घातल्या आहेत. आमचे संस्कार, संस्कृती आमच्या पाठीशी आहे. आम्ही त्यानुसार काम करतो. पण या लोकांनी जर मंचावर येऊन दम देत असतील तर आम्ही काय बांगड्या घालून बसलेलो नाही. माझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर ओवेसींवर १०० टक्के गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी काही गुन्हा दाखल होण्याला घाबरणारी नाही. ज्या हिंदुस्तानमध्ये आम्ही राहत आहोत तिथे हे लोक आम्हाला उघडपणे धमकी देत आहेत. याच्यासाठी बोलावच लागेल. उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत," असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
 

Web Title: Loksabha Election No matter how many cases are filed I will not be afraid says Navneet Rana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.