एम. कॉम. परीक्षार्थींना चुकीची प्रश्नपत्रिका
By admin | Published: April 27, 2017 01:08 AM2017-04-27T01:08:04+5:302017-04-27T01:08:04+5:30
गलथान कारभार : विद्यापीठातील दूरशिक्षण केंद्राचे विद्यार्थी
कोल्हापूर : दुसऱ्या सत्रातील पेपरवेळी पहिल्या सत्रातील प्रश्नपत्रिका परीक्षार्थींच्या दिल्याचा प्रकार ‘एम. कॉम. भाग एक’च्या परीक्षेवेळी बुधवारी घडला. या प्रकारामुळे पाऊण तास उशिरा पेपर सुरू झाला. चुकीची प्रश्नपत्रिका मिळण्याचा हा गेल्या दोन महिन्यातील दुसरा प्रकार आहे.
शिवाजी विद्यापीठाकडून विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. एम. कॉम. भाग एक अभ्यासक्रमाच्या सत्र दोनमधील पुनर्रपरीक्षार्थींचा बुधवारी सकाळी ११ ते २ या वेळेत ‘मॅनेजमेंट कन्स्पेट अॅण्ड आॅर्गनायझेशनल बिहेव्हिअर’ या विषयाचा पेपर होता. मात्र, संबंधित विषयाची पहिल्या सत्रातील प्रश्नपत्रिका परीक्षार्थींना मिळाल्याचे निदर्शनास आले. त्याची माहिती पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांनी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाला तातडीने दिली. त्यावर मंडळाने सुधारित प्रश्नपत्रिका सर्वच केंद्रांवर पाठविली. त्यामुळे पूर्वनियोजित वेळेपेक्षा पाऊण तास उशिरा पेपर सुरू झाला. (प्रतिनिधी)
प्रश्नपत्रिका नियोजकांच्या चुकीमुळे बुधवारीच्या एम. कॉम. अभ्यासक्रमाच्या पेपरवेळीचा हा प्रकार घडला असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले.
प्रश्नपत्रिका नियोजकांनी योग्य पद्धतीने पेपर सेट केले. मात्र, ते पाकिटामध्ये बंद करताना अदला-बदल झाल्याची शक्यता आहे.
चुकीची प्रश्नपत्रिका वितरणाचे हे प्रकरण विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाद समितीसमोर ठेऊन दोषींवर विद्यापीठ कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही काकडे म्हणाले.