वसंतदादा बॅँक घोटाळाप्रकरणी मदन पाटील यांच्या मालमत्तांची जप्ती
By admin | Published: June 19, 2017 05:45 PM2017-06-19T17:45:43+5:302017-06-19T19:07:38+5:30
अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी गुरुवारी कॉँग्रेसचे
ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 19 - अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी गुरुवारी कॉँग्रेसचे दिवंगत नेते मदन पाटील यांच्या पत्नी व मुलींच्या नावावर असलेल्या दहा मालमत्ता जप्त करण्याचे आदेश चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी दिले. यासंदर्भात संबंधित वारसदारांना नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सहकारी बँकिंग क्षेत्रात एकेकाळी मोठा दबदबा असणाऱ्या या बँकेतील तत्कालीन संचालक, अधिकाऱ्यांनी नियमबाह्य व असुरक्षित कर्जवाटप मोठ्या प्रमाणावर केले. तीनशे कोटींहून अधिक रुपयांच्या कर्ज प्रकरणात आक्षेप नोंदविण्यात आले होते. कलम ७२ (३) प्रमाणे अंतिम झालेल्या चौकशीत १०७ खात्यांमधील २४७ कोटी ७५ लाखांच्या रकमेबाबत आरोप ठेवण्यात आले होते. दोषारोपपत्रावरील सुनावणीचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच, मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांची मालमत्ता विक्रीस काढण्यात आली होती. वृत्तपत्रात त्याविषयीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल चौकशी अधिकाऱ्यांनी घेतली.
भविष्यातील वसुलीच्या कारवाईस अडथळा निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने चौकशी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६0 च्या कलम ८८ व ९५ मधील तरतुदीनुसार प्रकरणातील सर्व माजी संचालकांच्या व अधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश यापूर्वी दिले होते, मात्र याविरोधात माजी संचालकांनी महाराष्ट्र राज्य सहकार अपिलीय न्यायालयाच्या पुणे खंडपीठाकडे अपील केले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने हा जप्ती आदेश रद्द केला होता. यासंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली नसल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मालमत्ता जप्तीसाठी पुन्हा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यावरील सुनावणीचे कामकाज मागील आठवड्यात संपले. एकाच माजी संचालकांच्या वारसदारांनी मालमत्ता विक्रीचा प्रयत्न केल्याने सर्वच माजी संचालक अशी कृती करतील, असा निष्कर्ष काढता येणार नाही, असा युक्तिवाद काहींनी केला होता. तो ग्राह्य धरून चौकशी अधिकाऱ्यांनी केवळ मदन पाटील यांच्या तिन्ही वारसदारांच्या दहा मालमत्ता जप्त करण्याचा आदेश चौकशी अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यानुसार आता पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. कवलापूर, पद्माळे आणि सांगलीतील दहा मालमत्तांचा यात समावेश आहे. या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
या मालमत्तांची जप्ती
कवलापूर येथील गट क्र. १५0२/अ (१.३४ आर), २२८४ (0.0९ आर), २२९0 (0.१0 आर) व १८९६, पद्माळे येथील गट क्र. २४७/अ (0.२७), गट क्र. २४७/ब (0.५0 आर), गट क्र. ५0 (0.३९ आर), २५५ (0.७९ आर), २५९ (0.0२ आर) व सांगलीतील सि.स.क्र. १३५४९ ही ७६२.१ चौरस मीटर जागा जप्त करण्याचा निर्णय झाला आहे.
महसूल विभागाला सूचना
महसूल विभागास यासंदर्भात सूचना दिली जाणार असून, या दहा मालमत्ता जप्त करून त्यावर वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँक लि. (अवसायनात) असे नाव लावावे, अशा आशयाचे पत्र दिले जाणार आहे. कलम ८८ ची चौकशी पूर्ण होऊन संबंधितांकडून रकमेची वसुली होईपर्यंत ही जप्ती राहणार आहे.
अन्य माजी संचालकांना दिलासा
या प्रकरणातील अन्य दिग्गज माजी संचालक व अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्यातरी त्यांच्या कोणत्याही मालमत्तांची जप्ती होणार नाही.
चौकशी प्रक्रियेकडे लक्ष
महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६0 अंतर्गत कलम ८८ व त्याखालील नियम १९६१ च्या कलम ७२ (३) नुसार सध्या आरोपपत्रावरील काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याबाबतच्या निर्णयाकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे.