जैन मुनींवर राग काढण्यापेक्षा लोकांनी का नाकारले याचा विचार करा, माधव भंडारी यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 07:43 PM2017-08-23T19:43:49+5:302017-08-23T19:46:18+5:30
राज्याच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून शिवसेनेची अपयशाची मालिका चालू असून मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीतील शिवसेनेचा पराभव ही त्या मालिकेतीलच पुढची कडी आहे.
मुंबई, दि. 23 - राज्याच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून शिवसेनेची अपयशाची मालिका चालू असून मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीतील शिवसेनेचा पराभव ही त्या मालिकेतीलच पुढची कडी आहे. लोक आपल्याला सातत्याने का झिडकारतात, याची कारणे शोधण्याच्या ऐवजी शिवसेनेने आपल्या पराभवाचा राग एका जैन मुनीवर काढणे हा रडीचा डाव आहे,असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी बुधवारी दिले.
सर्वसंगपरित्याग करून पूर्णवेळ समाजासाठी काम करणाऱ्या आदरणीय मुनींवर आगपाखड करणाऱ्या शिवसेनेला हिंदुत्वाचा वारसा सांगायचा काहीही नैतिक अधिकार नाही. नयनपद्मसागर मुनींची तुलना दहशतवादी कारवायातील आरोपी असलेल्या एका धार्मिक प्रवचनकाराशी करणे ही शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी आहे, अशा शब्दांमध्ये भंडारींनी शिवसेनेवर टीका केली.
त्यांनी सांगितले की, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार उत्तम काम करत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या प्रत्येक महापालिका, नगरपालिका,जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत भाजपाची ताकद वाढली आहे. जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पुनःपुन्हा पसंती दिल्यामुळे भाजपाला यश मिळत आहे. ही शिवसेनेची खरी पोटदुखी आहे. मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत आपल्याला थोडेसेच यश मिळाले आणि भाजपाला मात्र लोकांनी संपूर्ण यश दिले याबद्दल शिवसेनेला वाईट वाटणे आश्चर्यकारक आहे. उगाच जैन मुनींवर आगपाखड करून जनादेशाचा अपमान करण्यापेक्षा जनतेचा आदर केला तर शिवसेनेचे राजकारणात काही तरी स्थान उरेल, असा टोला त्यांनी हाणला.