महाराष्ट्राला हुडहुडी , महाबळेश्वरच्या वेण्णा लेकमध्ये 0 अंश तापमान

By admin | Published: January 8, 2017 09:26 AM2017-01-08T09:26:13+5:302017-01-08T11:48:51+5:30

जवळपास संपूर्ण महाराष्ट्र सध्या थंडीने गारठला आहे. सर्वत्र प्रचंड गारवा, बोचणारा थंडगार वारा आणि त्यापासून बचावासाठी शेकोटीची धडपड

Maharashtra is at 0 ° C in Hoodhudi, Venala Lake in Mahabaleshwar | महाराष्ट्राला हुडहुडी , महाबळेश्वरच्या वेण्णा लेकमध्ये 0 अंश तापमान

महाराष्ट्राला हुडहुडी , महाबळेश्वरच्या वेण्णा लेकमध्ये 0 अंश तापमान

Next
>ऑनलाइन लोकमत
 
सातारा, दि. 8 - जवळपास संपूर्ण महाराष्ट्र सध्या थंडीने गारठला आहे. सर्वत्र  प्रचंड गारवा, बोचणारा थंडगार वारा आणि त्यापासून बचावासाठी शेकोटीची धडपड असे चित्र पाहायला मिळत आहे. 
 
महाबळेश्वरच्या सुप्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.  तापमान खालावल्यामुळे पर्यटक चांगलेच गारठले आहेत. मात्र, गुलाबी थंडीमुळे पर्यटकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. शून्य अंश तापमानामुळे हिमकणांचा गालिचा पसरला आहे. झाडांवरील दवबिंदू गोठले असून परिसराला बर्फाच्छादित रूप आलं आहे.
 
पुण्यामध्येही तापमानाचा पारा सातत्याने खालावत आहे.  पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात धुक्याची दाट चादर पसरली आहे. दाट धुक्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावरची वाहतूक धीम्यागतीनं सुरू आहे. वाहनं चालवताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 
पुढील काही दिवस राज्यातील गारठा असाच कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. 
उत्तरेतील वाढत्या थंडीच्या कहराचा परिणाम महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, ओडिशा, कोकण, गोवा, कर्नाटकपर्यंत जाणवत आहे. येथील किमान तापमानात सरासरीपेक्षा घट झाली आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असून गारठा चांगलाच वाढला आहे. नगर, नाशिकसह खान्देशात तर थंडी आहे. मुंबई व कोकणपट्टीतही दोन दिवस चांगला गारठा आहे. राज्यात शनिवारी सर्वात कमी किमान तापमान नगर येथे 6.3 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पश्चिम महाराष्ट्रातही गारठा कमालीचा वाढला आहे. पुण्यात हंगामातील सर्वात निच्चांकी 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून पुणेकरांनाही बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे.
 
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या व विदर्भातही किमान तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. तापमान कमी होणे आणि थंडीची लाट येणे नाशिककरांना नवीन नाही, सातत्याने नाशिकमध्ये कमी तापमानाची नोंद केली जात आहे. मुंबई- नाशिक महामार्गावरही धुक्यामुळे वाहतूक धीम्यागतीने सुरू आहे.  नाशिकमध्ये 9.1 तापमानाची नोंद करण्यात आली आहे तर  धुळ्यामध्ये 8.8 अंश सेल्सियस इतका पारा खाली उतरला आहे. कोल्हापूरचा पारा 14 अंशावर घसरला आहे तर  मालेगावचा पाराही 11.6 अंशावर आला आहे.  तर, एरवी घामाच्या धारांनी ओथंबळणारे मुंबईकरही सध्या गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत.
 
महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर भारताच्या अनेक भागांत थंडीची लाट पसरली आहे. तुफान बर्फवृष्टीमुळे काश्मीरचा उर्वरित देशापासूनचा संपर्क सलग दुसऱ्या दिवशी तुटलेला आहे. बहुतांश ठिकाणी पारा शून्याच्या खाली आला आहे. गुलमर्ग हे राज्यातील सर्वांत थंड ठिकाण ठरले. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडातही बर्फवृष्टी झाली असून, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत पाऊस झाला आहे.
 
काश्मीर खोऱ्याची जीवन रेषा असलेला श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी वाहतुकीसाठी बंद राहिला. पीर पांजाल पर्वतराजीत अनेक ठिकाणी बर्फाचे कडे कोसळून, तसेच जमीन खचून महामार्ग बंद झाला आहे. श्रीनगर विमानतळाच्या धावपट्टीवर बर्फ साचला असल्याने, हवाई वाहतूकही ठप्प आहे. गुलमर्ग स्की रिसॉर्ट येथील तापमान उणे (-) ८.४ अंशावर घसरले आहे. हे राज्यातील सर्वांत थंड ठिकाण ठरले. पहलगाम, लेह लदाख आणि राजधानी श्रीनगर अशा बहुतांश सर्वच ठिकाणी तापमान शून्याच्या खाली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली.

शनिवारी राज्यातील विविध शहरांत नोंदवण्यात आलेलं तापमान -
 
 
 

Web Title: Maharashtra is at 0 ° C in Hoodhudi, Venala Lake in Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.