Maharashtra Bandh : मराठ्यांचा आवाज आता दिल्लीत घुमणार : शाहू छत्रपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 04:26 PM2018-08-09T16:26:29+5:302018-08-09T16:43:20+5:30
आरक्षण मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही. आता मराठ्यांचा आवाज दिल्लीत घुमल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शाहू छत्रपती यांनी गुरूवारी येथे दिला.
कोल्हापूर : आरक्षण मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही. आता मराठ्यांचा आवाज दिल्लीत घुमल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शाहू छत्रपती यांनी गुरूवारी येथे दिला.
कोल्हापूरात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित जाहीर यल्गार सभेत ते बोलत होते.दसरा चौकात सकाळी नऊ वाजल्यापासूनच युवक गावागावातून हातात भगवे झेंडे घेतलेले युवक मोटारसायकल वरुन यायला सुरुवात झाली.
सकाळी अकरा वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर चार वीरमातांच्या हस्ते आॅगस्ट क्रांतिदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीत, शाहू गौरवगीत, महाराष्ट्र गीत व मराठा आरक्षण गीताने जाहीर सभेचा प्रारंभ झाला.
अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. प्रमुख उपस्थिती महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, खासदार धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री सतेज पाटील, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सत्यजीत पाटील-सरुडकर, माजी आमदार मालोजीराजे, समन्वयक दिलीप देसाई, इंद्रजीत सावंत, वसंतराव मुळीक, प्रा. जयंत पाटील आदींची होती.
शाहू छत्रपती म्हणाले, आरक्षणाच्या मागणीसाठी जमलेल्या मराठ्यांचा आवाज दिल्लीत घुमल्याशिवाय राहणार नाही. हा आवाज पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवावा लागेल. कारण केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे कोणतेही कारण न सांगता सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे.
डॉ. थोरात म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सुरु असलेला लोकांचा आवाज सरकारने ऐकावा. या सरकारने काहीच केले नाही असे म्हणता येणार नाही. परंतु आरक्षणाचा प्रश्न अजून मार्गी लावलेला नाही. मराठा समाजातील दुर्बल घटकाला शिक्षण व रोजगाराची हमी मिळेल तेव्हाचे खऱ्या अर्थाने युध्द जिंकले जाईल.
जयसिंगराव पवार म्हणाले, आरक्षणाचे आंदोलन हे असेच धगधगत ठेवले पाहीजे. त्या शिवाय सरकार नमणार नाही. आंदोलकांनी या सरकारला चांगलेच वठणीवर आणले आहे. मराठा तरुणांनी आततायीपणा करुन आत्महत्या करु नये. कारण ही लढाई तुमच्यासाठीच सुरु आहे.
प्रतापसिंह जाधव म्हणाले, तामिळनाडूत जयललितांनी खंबीरपणे पेरियार समाजला आरक्षण मिळवून दिले. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सारखी हातात काकणं भरली नव्हती. यावेळी दिलीप देसाई, वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत, प्रा. जयंत पाटील, सचिन तोडकर, हर्षल सुर्वे यांचे भाषण झाले. पंडीत कंदले यांनी सुत्रसंचालन केले.
निर्वाणीचा इशारा
चार वर्षे उलटूनही सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक नाही. त्यामुळे आमचा संयम आता संपत चालला आहे. केंद्रात व राज्यात तुमचे सरकार असल्याने घटनेत दुरुस्ती करा व लवकरात लवकर आरक्षण द्या, असा निर्वाणीचा इशारा या जाहीर यल्गार सभेत मराठा नेत्यांनी दिला.