BLOG: शरद पवारांइतकी धमक अजित पवार दाखवतील का अन् कशी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 12:10 PM2019-11-23T12:10:30+5:302019-11-23T12:12:06+5:30
जनसंघ, समाजवादी, डावे वगैरे सर्वांच्या पाठिंब्यावर पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांचं 'पुलोद' सरकार शक्तीशाली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बरखास्त केलं.
>> सुकृत करंदीकर
1978 - जनसंघाच्या पाठिंब्यावर पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवले ते शरद पवार.
2014 - महाराष्ट्रात भाजपने न मागताही पाठींबा देणारे होते ते शरद पवार.
2019 - 'घरात नाही पीठ आणि तुम्हाला कशाला हवे विद्यापीठ,'
'मंडल कमिशन आणि आरक्षणाला विरोध; समान नागरी कायदा हवा,'
'बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा अभिमान आहे.'
- या सारख्या प्रतिगामी भूमिका घेणार्या सेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून प्रयत्न करणारे शरद पवार.
2019, नोव्हेंबर - शेतीच्या प्रश्नावर पंतप्रधान सलग 45 मिनिटं देशात कोण्याच एका व्यक्तीशी चर्चा करत नसतात. पण तशी ते करत बसले ती व्यक्ती होती शरद पवार.
2019, नोव्हेंबर - अजित पवार एकटेच जाऊन भाजपाच्या मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात; हा अजित पवारांचा व्यक्तीगत निर्णय आहे, पक्षाचा नव्हे, असे सांगतात तेही शरद पवार.
कशावर विश्वास ठेवायचा आणि कशावर नाही, हे सांगणं अवघड आहे. 'प्रतिमा' किती महत्वाची, याचा प्रत्यय प्रकर्षाने शरद पवारांना या क्षणी येत असणार.
अजित पवार मात्र त्यांचं राजकीय पाऊल नेमकेपणानं काकांच्या पावलावर टाकत आहेत. "चालून येईल त्या संधीचा पुरेपुर वापर करत येनकेनप्रकारे राजकारणातली आपली उपयुक्तता, मूल्य आणि प्रासंगिकता टिकवून ठेवणे; आजच्या भाषेत relevant राहणं,'' हेच तर शरद पवार यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दिचं सूत्र राहिलं आहे. हे सूत्र जुळवून आणण्यासाठी मोठ्या हिकमती कराव्या लागतात. ती ताकद अजित पवारांकडे आहे का, हे लवकरच सिद्ध होईल. 'दादागिरी' काकांच्या पुण्याईवर होती की खरी धमक त्यांच्यात आहे, हे आता दिसेल. 'राष्ट्रवादी'चे किमान 40 आमदार अजित पवारांना सोबत घ्यावे लागतील. जनसंघ, समाजवादी, डावे वगैरे सर्वांच्या पाठिंब्यावर पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांचं 'पुलोद' सरकार शक्तीशाली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बरखास्त केलं. त्यानंतरही 1980 मध्ये चाळीशीही न ओलांडलेल्या शरद पवारांनी 50-55 आमदार स्वबळावर निवडून आणले. ही धमक होती शरद पवारांची. आता साठीच्या घरातील अजित पवारांना अशीच कामगिरी करुन दाखवावी लागेल. नरेंद्र-देवेंद्राच्या केंद्र आणि राज्यातल्या सत्तेचं बळ त्यांच्या पाठीशी असेल.
राजकारण क्रुर असतं. तीव्र स्पर्धा, ईर्षा आणि महत्वाकांक्षा यांनी भरलेलं असतं. शरद पवार यांनीही सत्तेच्या ताकदीवर महाराष्ट्रातले अनेक पक्ष, गट-तट, घराणी, आघाड्या आजवर फोडल्या. अंकित केल्या. याचं कौतूक 'बेरजेचं राजकारण' असं केलं गेलं. राज ठाकरे यांच्या रुपाने बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवारातील वाद जगजाहीर झाले. अजितदादांनी शपथ घेतल्याने शरद पवारांचंही घर फुटू शकतं, हे महाराष्ट्रानं पहिल्यांदाच पाहिलं. 'राष्ट्रवादी'त आता उभी फुट अटळ आहे; पण ती किती यावर अजित पवारांची भविष्यातली 'दादागिरी' अवलंबून आहे. पवारांच्या घरातील दुहीमुळे आणि शरद पवारांच्या वार्धक्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण निर्णायक वळणावर येऊन ठेपलं आहे. या वळणाचे शिल्पकार अजित पवार ठरतील का?
#WATCH Mumbai: Devendra Fadnavis takes oath as Maharashtra Chief Minister again, oath administered by Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan. pic.twitter.com/kjWAlyMTci
— ANI (@ANI) November 23, 2019
महत्त्वाच्या राजकीय बातम्याः
अजित पवारांनी बंड करताच, रोहित पवारांचा फेसबुक प्रोफाईलचा फोटो बदलला !
30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करा; राज्यपालांची मुख्यमंत्री फडणवीसांना सूचना
संजय राऊत यांनी शिवसेनेची, महाराष्ट्राची वाट लावली - चंद्रकांत पाटील
रात्रीस खेळ चाले... महाराष्ट्रात 'असा' झाला राजकीय भूकंप!