Maharashtra Election 2019: मुंडेसाहेबांनी मला 'या' 3 गोष्टी शिकवल्या, पंकजा मुंडेंनी सांगितलं राजकीय यशाचं गमक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 02:38 PM2019-10-10T14:38:42+5:302019-10-10T14:39:52+5:30
Maharashtra Election 2019: बीड जिल्ह्यात पंकजा यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली.
भाजपा नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडें यांनी बीड जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेला संबोधित करताना, पंकजा यांनी केलेल्या विकासकामाची माहिती दिली. तसेच, बीड जिल्ह्यात पाऊस कमी पडला, पण मी निधीचा पाऊस आणलाय. पुढील मंत्रिमंडळातही मी असणार आहे, या जिल्ह्याचं पालकत्व मी स्विकारणारंय, असे म्हणत पुन्हा एकदा आपणच पालकमंत्री होणार असल्याचं पंकजा यांनी म्हटले.
भाजपात मोठ्या प्रमाणात मेगा भरती झाली आहे. मात्र, या मेगा भरतीचा नारळही बीडमध्येच फुटला. सुरेश धस यांच्यापासूनच ही सुरुवात झाल्याचं पंकजा यांनी सांगितलं. मेगा भरतीची आता मेगा गळती सुरू झाली आहे, असे म्हणत राष्ट्रवादी-काँग्रेसवर टीका केली. तसेच, राजकारण करताना, माझ्या वडिलांनी, मुंडेसाहेबांनी मला राजकारणात तीन गोष्टी शिकवल्या. त्या कानमंत्राला सोबत घेऊनच मी राजकारण करते. राजकारणात कधीही कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. राजकारण नेहमी बेरजेचं करायचं आणि सर्वात महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे, स्वत: जिथून निवडणूक लढवत आहोत, त्याबद्दल स्वत:ला कधीही असुरक्षित वाटून घ्यायचं नाही. या तीन गोष्टींची मी मनाला गाठ बांधून इथपर्यंत पोहोचले आहे. ज्यांनी माझ्या जन्मापासून निवडणुका लढवल्या त्या सुरेश धसांना सांभाळणं सोप्पयं का, पण मी तेही करतेय. कदाचित मला ते जमतंय असं सुरेश धस दाखवण्याचा प्रयत्न करतील, असे पंकजा यांनी म्हटले. त्यानंतर उपस्थित जनसमुदायात हशा पिकला.
बीड जिल्ह्यात पंकजा यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत शिवसेना आणि भाजपा महायुतीच्या उमेदवारांना निवडूण देण्याचं आवाहन केलं. तसेच, जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रीपद मिळावं, यासाठी मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचंही पंकजा यांनी सांगितल.